नागोराव सा. येवतीकर

Saturday, 6 January 2018

एकच ध्यास ; वाचन विकास

एकच ध्यास ; वाचन विकास

शिक्षण प्रक्रियेतील वाचन हे एक प्रमुख कौशल्य आहे. ज्यावर विद्यार्थ्यांची भविष्यातील प्रगती अवलंबून असते. भाषा विकासातील श्रवण व भाषण यानंतरचा टप्पा म्हणजे वाचनकौशल्याचा. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ स्टुअर्ट रिची यांनी आपल्या संशोधनात असे म्हटले आहे की, मुलांची वाचन क्षमता आणि त्याला किती लहान वयात वाचन करता येते त्यावर त्याची पुढील प्रगती अवलंबून आहे. यासोबत ते पुढे असे म्हणतात की, आपल्या मुलांचा अभ्यास पक्का करायचा असेल तर तो शाळेतील पुस्तके वाचतो की नाही हे तर बघावेच, याशिवाय अन्य काही अवांतर पुस्तक वाचन करतो की नाही , याकडे सुद्धा लक्ष ठेवावे. कारण जी मुले अवांतर पुस्तकांचे वाचन करतात त्यांचाच अभ्यास पक्का असतो असा आजपर्यंतचा अनुभव सांगतो. परंतु आपण तसे न करता मुलांवर नेहमी अभ्यासाचे ओझे टाकीत असतो. फालतू वाचन करण्यात वेळ घालविण्यापेक्षा तेवढाच वेळ शाळेचा अभ्यास केलास तर चार-पाच मार्क जास्त पडतील ! असा उपदेश मुलांना प्रत्येक घरातून मिळत असतो. यातून आपण आपल्या मुलांना फक्त परीक्षार्थी बनवित नाही काय ? याशिवाय मुले जास्तीत जास्त वेळ वाचनात कसा घालावतील या दृष्टिकोनातून आपण कधी विचार केलाय का ? मुलांना अवांतर वाचन करता यावे यासाठी घरात वाचनासाठी उपयुक्त असा पुस्तकांचा साठा करावा. मुलांना पुस्तकालयाच्या ठिकाणी नेऊन त्यांच्या आवडीचे पुस्तक निवडण्यास मदत करावी. लहान मुलांसाठी प्रकाशित होणाऱ्या मासिक किंवा साप्ताहिक वृत्तपत्राचे वर्गणीदार व्हावे. यातून मुलांवर हळूहळू वाचन संस्कार होऊ शकतात. टी.व्ही. किंवा मोबाईलवरील चित्रे पाहण्यापेक्षा पुस्तकातील रंगीत चित्रे पाहणे कधी ही चांगले. कारण टी.व्ही. किंवा मोबाईलवरील चित्रे मुलांना निर्बुद्ध, आळशी व अकार्यक्षम बनवू शकतात. तर पुस्तकातील चित्रे मुलांना नवप्रेरणा देतात, चेतना निर्माण करतात. त्यातून त्यांना काही तरी नवनिर्मिती करण्याची स्फूर्ती मिळते. वाचनातून मग मुलांच्या बुद्धीचा विकास होतो. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जर वाचनाचे वेड राहिले नसते तर ते महामानव बनूच शकले नसते आणि त्यांच्या हातून घटना निर्मितीचे एवढे महान कार्य घडले नसते. तासनतास ते ग्रंथालयात बसून वाचन करीत असत. त्यातूनच त्यांना नवीन ज्ञान मिळत होते. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे दिवसातून अठरा तास वाचन करीत असत. परंतु आज सर्वाना वाचन म्हटले की कंटाळा येतो. घरात मुलांना पुस्तकांचे वाचन करा असे म्हणण्यापूर्वी घरातील वडीलधारी मंडळीनी वाचन करणे आवश्यक आहे. रोज सकाळी आपल्या घरात येणाऱ्या वृत्तपत्राने मुले वाचनाकडे वळू शकतात. आपल्या घरी कमीतकमी दोन वृत्तपत्र नियमित यायला हवे. यामुळे नकळत मुले अवांतर वाचनाकडे जाऊ शकतात. अगदी सुरुवातीला तो चित्रेच पाहिल परंतु कालांतराने त्याला त्यातील मजकूर वाचण्याची आवड लागते. जो चांगल्या प्रकारे वाचन करतो त्याचीच प्रगती उत्तमप्रकारे होत असते. शाळेत आज अशी स्थिती बघायला मिळते की पाचव्या वर्गातील मुले दुसऱ्या वर्गातील पुस्तकांचे अस्खलित वाचन करू शकत नाहीत. याचे करणे अनेक असू शकतात. मात्र खरे कारण म्हणजे त्याच्या वाचनाकडे आजपर्यंत कोणी लक्षच दिले नाही. चांगल्या प्रकारे लिहू शकतो मात्र वाचताना अडखळतो, असे का ? याचे उत्तर शोधण्याचा कधी प्रयत्न केलाय काय ? अर्थात याचे उत्तर नाही असे येते. वाचन करता येत नसल्यामुळे मुलांच्या मनात एक वेगळीच भीती निर्माण होते आणि कालांतराने तो शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर जातो. प्राथमिक शिक्षण चालू असतानाच त्या मुलांवर वेळीच उपचार झाल्यास मुलांची प्रगती शक्य आहे. प्रत्येक मूल शिकू शकते, वाचू शकते असा विश्वास जोपर्यंत शिक्षकांमध्ये तयार होत नाही तोपर्यंत त्या मुलांची प्रगती होऊ शकत नाही. शिक्षकांचा मुलांविषयी असलेला सकारात्मक दृष्टिकोनच मुलांना पुढे नेऊ शकते आणि नकारात्मक दृष्टिकोन आपणास प्रयत्न करायला सुरुवात करू देत नाही. एखाद्या मुलांना काय येते आणि काय येत नाही हे आपण आत्ताच ठरविता येत नाही. पण त्या मुलांना तो भाग समजला नसेल तर वेगळ्या पद्धतीने सांगावे लागते. आजपर्यंत आपण प्राथमिक वर्गात महाविद्यालयाच्या व्याख्यान पद्धतीने सांगत आलो. गरज असणाऱ्या मुलांना आणि गरज नसणाऱ्या मुलांना सुद्धा तेच शिकवीत आलोत म्हणजे समानतेने शिकविलो. पण ज्याला अजून शिकविण्याची गरज आहे, ती त्याची गरज पूर्ण न करता पुढे जात राहिलो त्यामुळे तो मागे पडला, त्याला कधी तरी समतेने शिकविलो काय ? प्रत्येक शिक्षकांनी याचे स्वतः शी आत्मपरीक्षण करणे आज गरजेचे आहे. म्हणूनच शासनाने यावर्षी इयत्ता पहिली ते पाचवी वर्गातील सर्व मुलांना अस्खलित वाचन करता यावे म्हणून साठ दिवसाचा मूलभूत वाचन विकास कार्यक्रम आणित आहे. ज्यात प्रत्येक मुलांची वाचन विकासाच्या आठ टप्प्यात विचार केला जाणार आहे. विद्यार्थी ज्या टप्प्यावर आहे तेथून त्या विद्यार्थ्यांचा वाचन कौशल्य विकसित करता येणार आहे. डॉक्टर ज्या प्रकारे एखाद्या रुग्णाची केस स्टडी करतो त्याचा धर्तीवर शिक्षक आत्ता मुलांची केस स्टडी करणार आहेत. सर्व शिक्षकांचा आत्ता एकच ध्यास लागलेला आहे ते म्हणजे वाचन विकास. ज्ञान प्राप्त करण्यासाठी वाचन आवश्यक आहे. म्हणूनच म्हटले आहे " वाचाल तर वाचाल "

- नागोराव सा. येवतीकर
( लेखक उपक्रमशील प्राथमिक शिक्षक आहेत.)
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

Friday, 5 January 2018

पत्रकार दिन

वृत्तपत्राचे जनक : बाळशास्त्री जांभेकर

घरातील वडीलधारी मंडळी रोज सकाळी ज्याची आतुरतेने वाट पाहतात ते म्हणजे वर्तमानपत्र अर्थात पेपर. वर्तमानपत्र वाचल्याशिवाय त्यांची सकाळ सुरूच होत नाही. एखाद्या दिवशी वर्तमानपत्र वाचण्यास मिळाले नाही तर दिवसभर काही तरी हरवल्यासारखे वाटते. तळागाळात, खेडापाड्यात अगदी दुर्गम गावात देखील आज हे वर्तमानपत्र पाहायला मिळते. मग खरोखरच हे वर्तमानपत्र कुणी आणि केव्हा सुरु केले ? याची माहिती जाणून घेण्यात सुद्धा आपण नक्कीच उत्सुक असाल. बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर अर्थात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक असे म्हणतात. त्यांचा जन्म दिनांक ६ जानेवारी १८१२ रोजी कोकणातील राजापूर तालुक्यातील पोंभूर्ले या गावी एका गरीब ब्राम्हण घरात झाला. लहानपणापासूनच ते अतिशय हुशार, चुणचुणीत  व कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. म्हणूनच त्यांनी अगदी लहान वयातच अनेक विषयातील शिष्यवृत्ती मिळवली आणि संशोधन सुद्धा केले. त्यांना माहित होते कि, ब्रिटिशांना भारतातून हाकालायचे असेल तर लोकांना जागरूक करणे अत्यंत करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी वर्तमानपत्र हे माध्यम सर्वात चांगले आहे. म्हणून त्यांनी गोविंद कुंटे व भाऊ महाजन यांच्या सहकार्याने वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजे ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण ‘ नावाचे वर्तमानपत्र प्रकाशन करण्यास सुरुवात केली. दर्पण म्हणजे आपले प्रतिबिंब हुबेहूब दाखविणारे एक साधन त्यास आपण आरसा असे म्हणतो. म्हणून दर्पण हे त्या काळातील समाजासाठी आरश्यासारखेच काम केले. ज्या काळात छपाई यंत्रणा, मुद्रण व्यवस्था विकसित झालेली नव्हती, त्या काळात त्यांनी वर्तमानपत्र प्रकाशन करण्याचे धाडस दाखविले. म्हणूनच त्यांचे कार्य अविस्मरणीय असे आहे. अगदी सुरुवातीच्या काळात दर्पण हे भारतीय लोकांसाठी एका बाजूला मराठी व ब्रिटिशासाठी दुसऱ्या बाजूला इंग्रजी अश्या दोन्ही भाषेत प्रकाशन करण्यात येत होती व त्या वर्तमानपत्राची किंमत एक रुपया ठेवण्यात आले होते. जवळपास साडे आठ वर्षे चाललेल्या या वर्तमानपत्रातून आचार्य जांभेकर यांनी इंग्रजानी केलेल्या लोकांवरील छळ, गुलामगिरी याविरुद्ध लोकांना जागे केले. अशिक्षित लोकांमध्ये जागृती निर्माण केली. विधवा पुनर्विवाहासाठी उत्तेजन दिले, त्याबाबत जनप्रबोधन ही केले. आज आपण प्रसिद्धी माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानतो.  त्या प्रसिद्धी माध्यमात मुद्रित वर्तमानपत्राचे स्थान अग्रगण्य असे आहे. दृक किंवा श्राव्य प्रसिद्धी माध्यमापेक्षा मुद्रित माध्यमाकडे लोकांचा कल सर्वात जास्त असतो आणि हे अगदी स्वस्तात सहज उपलब्ध होणारे असते.
   आज वर्तमानपत्राची संख्या भरमसाठ वाढलेली आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक प्रकारचे विविध भाषेतील वर्तमानपत्र आज आपणास वाचायला व बघायला मिळतात. वर्तमानपत्र चालविणे हे वाटते तेवढे सोपे काम नाही. एखाद्या वर्तमानपत्र किंवा साप्ताहिक चालविणाऱ्या मालक आणि संपादक यांचेशी संपर्क करून त्यांच्यासोबत याविषयी गप्पा करुन पहावे मग नक्कीच कळून चुकेल की रोजचा पेपर कसा बाहेर पडतो ? वर्तमानपत्राचा जमाखर्चाचा ताळेबंद न जुळल्यामुळे दरवर्षी अनेक वर्तमानपत्र काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. तर वाढत्या महागाईच्या काळात सुद्धा काही वर्तमानपत्र आजही तग धरून आहेत. जोपर्यंत वर्तमानपत्र आस्तित्वात आहेत तोपर्यंत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव कुणीही विसरणार नाहीत.
      आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे मराठी , संस्कृत, इंग्रजी व हिंदी या भाषेवर विशेष प्रभुत्व होतेच शिवाय गुजराती, बंगाली, फ्रेंच, ग्रीक, लॅटीन इत्यादी भाषा सुद्धा अवगत होत्या म्हणून ते उत्तम भाषांतरकार म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांनी लिहिलेली नीतीकथा हे पुस्तक खूप प्रसिद्ध झाले. हिंदी विषयाचे ते पहिले प्राध्यापक होते म्हणूनच त्यांना आचार्य ही उपाधी मिळाली. सन १८४५  मध्ये त्यांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे सर्वप्रथम प्रकाशन केले. वर्तमानपत्र क्षेत्रातील मंडळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचे स्मरण सदोदित मनात राहावे यासाठी त्यांचा जन्मदिवस दर्पण दिन तसेच पत्रकार दिन म्हणून साजरा करतात. आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे अल्पायुषी होते. कारण वयाच्या ३४ व्या वर्षी म्हणजे १८ मे १८३६ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी प्रणाम तसेच या क्षेत्रातील संपादक व पत्रकार, बातमीदार सर्वाना दर्पण दिन व पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा  

नागोराव सा. येवतीकर 
स्तंभलेखक, धर्माबाद
9423625769

Tuesday, 2 January 2018

सावित्रीबाई फुले जयंती निमित्त प्रासंगिक लेख

मी सावित्री बोलतेय

नमस्कार .....

मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले, माझा जन्म 03 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगांव येथे झाला. वयाच्या नवव्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी माझा विवाह झाला. मला शिक्षणाचा अजिबात गंध नव्हता. पण माझे पती महात्मा फुले यांनी मला शिकविले आणि घडविले. पुण्यात भिडेच्या वाड्यात मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा काढली. पण तिथे मुलींना शिकविण्यासाठी कोणीही तयार होत नव्हते. तेंव्हा ज्योतिबानी मला याठिकाणी शिकविण्यासाठी पाठविण्याचे ठरविले. मात्र मी होते अक्षरशत्रू, मला वाचताही येत नव्हते आणि लिहिताही. पण ज्योतिबानी खुप कष्ट घेऊन मला शिकविले, अन मला ही शिकण्याची हौस होतीच. मला शिकावे असे वाटले आणि मनावर घेऊन मी लवकरच शिकले. पुण्यातील शाळेत शिकविण्यासाठी मी तयार झाले. पण समाजातील काही कर्मठ लोक मात्र यास विरोध करू लागले. मुलींनी शाळा शिकू नये म्हणून काही लोक मुलींना शाळेत तर पाठवत नव्हतेच शिवाय मी शाळेला जात असताना लोक मला शिव्या शाप देऊ लागले. माझ्या अंगावर शेण टाकू लागले. मला दगड गोट्याने मारू लागले. तरीही मी मागे सरले नाही, की डगमगले नाही. मी मुलींना शिकविण्यासाठी रोज शाळेत जाऊ लागले. ज्यातून मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. मी आणि माझे पती ज्योतिबा यांनी मिळून लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झालेले पहायला मिळत आहे, याचा मला अभिमान वाटते. आज असे कोणतेही क्षेत्र नाही की जेथे महिलाचा सहभाग नाही. पण 200 वर्षापूर्वी असे चित्र नव्हते. स्त्री म्हणजे चूल आणि मूल एवढ्यापुरतीच मर्यादित होती. घराच्या उंबरठ्याबाहेर पडायची सुद्धा तिला परवानगी नव्हती. ती घरातील एक शोभिवंत वस्तू समजली जायची. शिक्षणाने मानवी जीवनाचा विकास होतो हे महात्मा फुले यांनी जाणले होते म्हणून त्यांनी सर्व प्रकारचे प्रयत्न करून महिलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट घेतले, त्यामुळे महिलांची आज प्रगती दिसून येत आहे. माझ्या जीवनात जे काही दुःख आणि कष्ट आले ते दुःख सर्व महिलांच्या जीवनात येत असतात. म्हणून महिलानी मागे येऊ नये. जीवनात आलेल्या संकटाला फक्त महिलाच यशस्वीपणे तोंड देऊ शकतात. तेवढी ईश्वरदत्त देणगी सहनशक्ती तिला प्राप्त असते. माझ्या जीवनात ज्योतिबा आले नसते तर मी तुमच्या सारखेच सर्वसामान्य सावित्री राहिली असती क्रांतिज्योति कधीच झाली नसती. म्हणून मला आज एकच गोष्ट सांगावेसे वाटते की आपल्या मुलींना शिक्षणापासून दूर करू नका. तिला खुप शिकवा. तिचे शिक्षण हे तिच्या एकटी पुरते मर्यादित नसते तर ती आपल्या घरातील सर्वाना शिक्षण देण्याचा विचार करू शकते. मात्र तेच जर निरक्षर स्त्री असेल तर ती आपल्या घरातील कोणत्याच सदस्याच्या शिक्षणाची काळजी करणार नाही. शिकलेली आई घरादाराला पुढे नेई असे म्हटले जाते ते काही उगीच नाही. 
पूर्वी पती मेल्यानंतर त्याच्या मागे पत्नीचे खुप हाल व्ह्ययचे. तिला विद्रूप केल्या जायचे. तिला समाजात कोठेही मानाचे स्थान मिळायचे नाही. त्या सर्वासाठी खुप कष्ट घेतले परंतु आज ही समाजात काही मोठा बदल झाला आहे दिसत नाही. आज शिकलेला समाज असून देखील अशिक्षित लोकांच्या पलीकडे वागत आहेत हे पाहून मनाला खुप खंत वाटते. जन्माला येणारी मुलगी असेल तर तिचे गर्भ पोटातच संपवायचे पातक शिकलेला समाज करताना पाहून दुःख वाटते. मुलगा हवा या हट्टापायी कित्येक मुलींचे गर्भ खुडणाऱ्या लोकांना काय म्हणावे ? मला वाटते त्यास कारण समाजातील चालू असलेल्या चालीरीती हे कारणीभूत असू शकतात. मुलीचा बाप म्हणजे डोक्याला ताप अशी विचारधारा समाजात मोठ्या प्रमाणात दिसून येते. मुलींच्या बापाला काय कष्ट आहेत हे मुलांच्या बापाला नक्कीच कळणार नाही त्यासाठी जावे त्यांच्या वंशा तेंव्हा कळे या उक्तीनुसार मुलीच्या बाप होऊन पहावे लागेल. जोपर्यंत लग्नात वधू पक्षा कडून घेण्यात येणारी  हुंडा पध्दत बंद होणार नाही तोपर्यंत हे असेच चालत राहणार असे वाटते. मुळात लग्न ही प्रक्रिया पारंपरिक व पुरातन  पध्दतीने आज ही चालू आहेत. जसे पूर्वी लग्न लावले जायचे अगदी त्याच प्रकारे आज ही लग्न लावले जातात.यात कुठे तरी बदल करणे अपेक्षित आहे. आजच्या विवाह पध्दतीमध्ये वेळ आणि पैसा दोन्हीही वारेमाप खर्च होतो मात्र त्याची खंत कोणालाच नाही. पोरीचा बाप जर गरीब असेल तर या लग्नविधीमध्ये त्याचा जीव अगदी मेटाकुटीला येतो. त्याच मुळे कदाचित त्यास मुलगी नको असते की काय अशी शंका येते. शासन ही मुलीला वाचविण्यासाठी लेक वाचवा लेक शिकवा यासारखे अभियान राज्यात राबवित आहे. तरी मुलींच्या शिक्षणात म्हणावा तेवढा फरक पडला नाही. स्त्री भ्रूण हत्येवर बंदी घातली तरी दर हजारी पुरुषा मागे स्त्रियांची संख्या काही वाढली नाही. आज ही तिला दुय्यम स्थान मिळते. 
साहित्य क्षेत्रात महिलांची म्हणावी तशी प्रगती नाही. ज्याप्रमाणात पुरुष मंडळी लिहितात आणि प्रकाशात येतात त्या प्रमाणात महिला लिहितात पण प्रकाशात येत नाहीत. काही वर्तमानपत्र महिलासाठी खास जागा ठेवतात किंवा पुरवणी सुध्दा काढतात जेणे करून सर्व स्त्रियांना लेखनाची संधी दिली जावी. पण येथे ही त्याच त्या महिला नियमित लेखन करतात. कविता किंवा लेख लिहिण्याच्या माध्यमातून प्रत्येकाला अभिव्यक्त होण्याची संधी मिळविता यावी असा उद्देश्य असतो. परंतु महिला कोणत्या ना कोणत्या वेगळ्याच कारणामुळे प्रसिद्धिपासून दूर राहतात. मनात एक वेगळी अनामिक भीती राहते. अश्या या परिस्थिती मध्ये सुद्धा काही महिला प्रसिद्धि माध्यमाच्या क्षेत्रात पुरुषापेक्षा काकणभर जास्त चांगले काम करीत आहेत याचे मात्र मला अभिमान वाटत राहते. महिलेच्या सुरक्षिततेचा प्रश्न कायम आहे. घराबाहेर पडणारी स्त्री मनातल्या मनात घाबरून राहत असते. रात्री ची वेळ ही तर स्त्रियासाठी जीवघेणीच असते. यापूर्वी दिल्ली शहरातील निर्भया प्रकरण कसे घडले हे आपण जाणून आहोतच. रोजचे वर्त्तमानपत्र उघडले की महिलांवर होणारे अत्याचाराची बातमी प्रकाशित झाल्याशिवाय पेपर पूर्ण होत नाही अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. महिला शिकली, सवरली आणि कमावती सुध्दा झाली पण अजुनही ती स्वतः मुक्त झाली नाही. ज्या दिवशी ती स्वतः चे निर्णय घेईल तो तिच्या जीवनात सोनियाचा दिन असेल.
हे सर्व जेंव्हा मी उघड्या डोळ्याने पाहते तेंव्हा मला अस्वस्थ वाटायला लागते. मला पुन्हा एकदा जन्म घ्यावे लागेल की काय असे ही कधी कधी वाटते. पण माझी काही गरज नाही, फक्त तुम्ही तुमच्या मुलींना उच्च शिक्षण देऊन तिला तिच्या पायावर उभी राहण्याची क्षमता तयार करा तोच माझा पुनर्जन्म असेल.

- नागोराव सा. येवतीकर
( लेखक उपक्रमशील प्राथमिक शिक्षक आहेत. )
  मु. येवती ता. धर्माबाद
  9423625769

Sunday, 31 December 2017

नवीन वर्ष सुखाचे जावो

नवीन वर्ष सुखाचे जावो

मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झालो आहोत. ख्रिसमस म्हणजे नाताळाचा सण संपला की, संपूर्ण जगाला नवीन वर्षाची चाहूल लागते. संपूर्ण जगात या नवीन वर्षाचे स्वागत वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. भारतात इंग्रज लोकांनी दीडशे वर्षे राज्य केले आणि जाता जाता त्यांच्या संस्कृतीमधील काही गोष्टी भारतात सोडून गेले. एक जानेवारीचा नवीन वर्षाचा कार्यक्रम हा पाश्चिमात्य पद्धतीचा असल्यामुळे बहुतांश जण यास विरोध दर्शवितात, ते खरेही आहे. कारण भारतातील हिंदू संस्कृतीप्रमाणे नवीन वर्ष चैत्र प्रतिपदेला प्रारंभ होतो. त्यास आपण गुढीपाडवा असे म्हणतो. हा दिवस शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा असतो. कारण याच दिवसापासून ते आपल्या शेतातील जमा-खर्चाचा हिशोब मांडतात. व्यापारी मंडळी आश्विन महिन्यातील अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करून त्यानंतर येणाऱ्या बलिप्रतिपदेला आपल्या नवीन व्यवहाराला सुरुवात करतात. दिवाळीच्या पाडव्याला व्यापारी नववर्ष मानतात. शासन किंवा सरकारी कार्यालयात आर्थिक लेखाजोखा व्यवस्थित राहण्यासाठी एक एप्रिल हा दिवस त्यांच्यासाठी नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात असते. बालगोपाळांची शाळा जून महिन्यात प्रारंभ होतो. या महिन्यात नव्या वर्गात, नव्या मित्रांसोबत आणि नव्या करकरीत पुस्तकांच्या भेटीसाठी उत्सुक असतो. त्यास्तव आपल्यासाठी जून महिना हा नववर्षाचा भासतो. असो, आपण सुद्धा या सर्वांसोबत नवीन वर्ष साजरा करीत असतो. नवीन वर्ष साजरा करताना केशव नाईक यांचे सुवचन नेहमी लक्षात ठेवावे. ते म्हणजे, जीवन हा एक घडविला जात असलेला सोन्याचा दागिना आहे. तो जितका काळजीपूर्वक घडविला जाईल तितका अधिक शोभेल. तेव्हा आपणा सर्वांचे जीवन सोन्याच्या दागिन्यांप्रमाणे सुंदर घडत जावो, परमेश्वर चांगली विचार करणारी बुद्धी आणि उत्तम पाहण्याची दृष्टी प्रदान करो हिच या नववर्षानिमित्त शुभेच्छा.

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769