नागोराव सा. येवतीकर

Monday, 6 March 2017

जागतिक महिला दिन विशेष

जागतिक महिला दिनानिमित्त प्रासंगिक लेख

*स्त्रियांनी लैंगिक छळाविरुद्ध एल्गार करावा....*

           
        08 मार्च रोजी जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण विश्वात मोठ्या गौरवाने साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे स्त्रियांच्या कर्तृत्वाचा व स्वाभिमानाचा दिवस. स्त्री ही कुठल्याही क्षेत्रात पुरुषाच्या मागे नाही हे तिने आपल्या बुद्धिच्या ,कर्तृत्वाच्या ,ध्येयाच्या आणि सामर्थ्याच्या बळावर सिद्ध करून दाखविले आहे.
        स्त्री ही जरी प्रत्येक क्षेत्रात झेप घेत असली तरीही तिला अनेक अडचणींना आताही समोर जावे लागत आहे हे आपल्याला नाकारता येत नाही हेही तितकंच खरं ! प्राचीन काळापासून स्त्रीला एक भोग वस्तू म्हणून पाहिले जात होते. पुरुष प्रधान संस्कृतीत तिचा आण्विक छळ होत गेला. 'मनुस्मृती' मध्ये तिला उपभोगाचे साधन समजल्या गेले ,काहींनी ती आध्यात्म मार्गातील धोंड वाटली तर काहींना तिला धूर्त ,लोभी ,कपटी व चरित्रहीन म्हणून कायम तिची अवेहलनाच केल्या गेली अशाप्रकारे सुरवातीपासुनच तिची मानसिक ,शारीरिक व भावनिक छळच होत गेलेला दिसून येतो.आणि आजही आपण आधुनिक युगात वावरत असताना स्त्रीची  अवेहलना होतच आहे. लैंगिक अत्याचार, विनयभंग, बलात्काराचे प्रकार रोजच घडत आहे हे कुठेतरी थांबले पाहिजे. यासाठी आपण जागृत झाले पाहिजे ही आज काळाची गरज आहे. समाजात वावरत असतांना कामाच्या ठिकाणी, कॉलेज मध्ये, सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी, रस्त्याने चालताना, रेल्वे  व बसमध्ये प्रवास करतांना सतत तिला लैंगिक छळाला समोर जावे लागत आहे. अश्या कित्येक महिलां ज्या रोज प्रवास करतात त्यांना बसमध्ये, ट्रेनमध्ये गर्दीच्या ठिकाणी पुरुषाचा विकृत स्पर्श सहन करावा लागतो. वाईट दृष्टीने स्त्रीकडे बघणे, तिला बघून शिट्टी वाजवणे, अश्लील हावभाव करणे, मोबाईल द्वारे अश्लील संदेश पाठवणे अश्या कितीतरी समस्याना महिलांना आजही समोर जावे लागत आहे. यामध्ये फ़क्त 10% महिलाच याला विरोध करतात तर 90%  महिला हा छळ मुकाट्याने सहन करताना दिसून येतात. लैंगिक छळ सहन करण्याच मुख्य कारण म्हणजे त्यांच्यातील आत्मविश्वासाची कमी, समाजातील सहकार्याची कमतरता, घरच्या लोकांशी न साधलेला मुक्त संवाद तर महत्वाचे कारण म्हणजे स्वत:च्या बदनामीची भीती होय. परंतु जोपर्यंत आपण समाजातील या वाईट मनोवृत्तीचा विरोध करणार नाही तोपर्यंत यांचीच परिणीती म्हणजे समाजात वाढत चाललेले स्त्रियांवरील अत्याचार कमी होणार नाही हे नक्की !
तेव्हा महिलांनी आता गरज आहे ती लैंगिक छळा विरुध्द आवाज उठवण्याची ,स्वत:मध्ये आत्मविश्वास निर्माण करून या वाईट मनोवृत्तीच्या सापांना ठेचण्याची, सार्वजनिक ठिकाणी लैंगिक छळाविरुध्द आवाज बुलंद करण्याची, अशा वासनाधिन लोकांना अद्द्ल घडविण्याची. या सर्व गोष्टींसाठी तिने पेटून उठले पाहिजे, स्वत:ला विरोध करण्यासाठी सक्षम बनविले पाहिजे तरच निर्भया अत्याचारासारखे कित्येक राक्षसी कृत्य समाजात घडणार  नाही. लैंगिक छळाविषयी आई वडिलांनी मुलींसोबत मुक्त संवाद साधने गरजेच आहे. मुली शिक्षणासाठी प्रवास करीत असतांना त्यांना असे  अनेक वाईट प्रसंग येत असतात, परंतु घरच्यांना ती सांगू शकत नाही. ही गोष्ट घरच्यांना सांगितली तर आपल शिक्षण कायमच बंद तर होणार नाही ना ? हा प्रश्न त्यांच्या समोर असतो. त्यामुळे ती घरच्यांना ही गोष्ट सांगत नाही. तेव्हा आई वडिलांनी आपल्या मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्याशी संवाद साधने काळाची गरज आहे. त्यांनी आपल्या मुलींना सहकार्य केले तर निश्चितच त्यांच मनोबल वाढेल व त्यांच्यात आत्मविश्वास वाढायला वेळ लागणार नाही.
        आज मुलीच्या संरक्षणासाठी
अनेक कठोर कायदे झालेले आहे.महाराष्ट्र राज्य महिला आयोग ,मुंबई यांच्या कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षणार्थ (प्रतिबंध ,मनाई आणि निवारण )अधिनियम 2013 च्या अंमलबजावणी नुसार जनजागृती अभियाना मार्फत अनेक महाविद्यालयात I C C ही नऊ लोकांची कमिटी
स्थापन कली आहे. लैंगिक छळाविषयी माहिती व दक्षता कशी घेतली पाहिजे याबद्दलची कार्यशाळा घेऊन मुलींना जागृत करण्याची मोहीम राबवली जात आहे. लैंगिक  छळात मुख्यत: मुलीकडे पाहून शिट्टी मारणे, मुलीकडे वाईट नजर फिरवणे, मुलींना अश्लील चित्र दाखविणे ,वाईट हातवारे करणे ,लैंगिक सेवांची मागणी करणे, वाईट स्पर्श करणे हे सर्व लैंगिक अपराध असून असे कृत्य करणाऱ्यावर कठोर करवाई होणार आहे. I C C (Internal  complaints  committee ) मध्ये मुलींनी ह्या कृत्याच्या विरोधात आवाज उठवले तर आणि तिला जर योग्य न्याय मिळाला नाही तर तिला न्यायालयात सुद्धा जाण्याचा अधिकार भारत सरकारने दिलेला आहे.तेव्हा प्रत्येक स्त्रियांनी आपल्यावर होणाऱ्या लैंगिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवले तर आता अशा हवशा ,गवशा व नवशाला चांगलीच चपराक बसणार आहे. तेव्हा गरज आहे फक्त अशा लैंगिक छळा विरुद्ध स्त्रियांनी एल्गार व निषेध करण्याची.

प्रा.वैशाली देशमुख 
कुही ,नागपूर
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••

*महिला दिन आणि आपण....*

" स्त्री जन्मा तुझी कहाणी
   ह्रदयी पान्हा नयनी पाणी"

ह्या ओळी कालौघात जरी धूसर झाल्या असल्या तरीही हे अर्धसत्य आहे हे आपण जाणतोच. ग्रामीण स्तर ते जागतिक स्तर या सर्वच स्तरातील महिलांसोबत संपर्क वजा हितगूज केले असता बरचं काही उमगलं. "ती" सध्या खूप काही मिळवून खूप काही गमावतेय हे एक कटू सत्य आहे. आज कन्येलाही 'हुकमी एक्का' ही बिरूदावली साजेशी ठरतेय, तरीही महिला म्हणून तिची त्रेधातिरपीट चूकत नाही. जरी ती जागोजागी विविध पदे भुषवित असली तरीही तिचं हळवं मनं कुटूंब व कार्यक्षेत्र यात सतत झुंझत असतं.
     'नेमेची येतो जागतिक महिलादिन', या उक्तीनुसार मग नैमित्तिक भाषणं, चर्चा, परिसंवाद, वाद-विवाद होतात व हवेत विरतातही. खरंतर दररोजच आपण हा दिवस लक्षात ठेवायला हवा. आज बहुतांश महिला शिक्षण व करीअर यास प्राधान्य देत आहेत, त्यामुळे त्यांची आरोग्याची, विवाहाची व अपत्य प्राप्तीची गणितं बदलली आहेत. कधीकधी तिची तारांबळ पाहता ती 'चूल व मूल' यातच बरी होती की काय असं वाटायला लागतं. कारण तिने स्वकर्तृत्वाने स्वतःची जबाबदारी वाढवून तर घेतलीय पण त्याची अंलबजावणी करतांना तिची पार दमछाक होतांना दिसते. ती घराबाहेर पडून पुरूषाच्या बरोबरीने काम करतेय तरीही घरी येताच चहाचा कप तिनेच समोर आणावा हा अलिखीत नियम अाजही अबाधित आहे. पै-पाहुण्यांची सरबराई , कुलाचार , मुलांचे अभ्यास इ.मधून तिला सूट नाही. या कसरतीत तिची चिडचिड नाही झाली तरच नवल. तमाम बंधूंना विनंती आहे की खरचं आपणास महिला दिनाचं कोडकौतूक असेल तर कुटूंबातील महिला तसेच कर्तव्यक्षेत्रातील सहकारी स्त्रियांची होईल तशी मदत अवश्य करा. निदान तिचे मानसिक खच्चीकरण होवू नये अशी वागणूक द्या. अपवादात्मक ठिकाणी भगिनींचीही चूक असू शकते. पण एखाद्या व्यक्तिची चुकीची वागणूक परीसरावर परिणाम करते हे सर्वांनी ध्यानात ठेवून आचरण करावे. एक माणूस  म्हणून एकमेकांना सहकार्य केलं तर  प्रगती अधिक होईल यात शंका नाही. रोजंदारीवर दुसऱ्याच्या शेतावर काम करणारी मजूर महिला असो अगर अधिकारीपदावरील महिला असो तिच्या प्राथमिक समस्या सारख्याच असतात. मानहानी, अपशब्द व असहकार या बाबी तिला कमजोर बनवू पहातात. परमेश्वरानं तिला सहनशिल बनवलयं तरी त्याला काही मर्यादा पडतात. कधीकधी असह्य होवून अप्रिय घटना घडतात. हे प्रमाण आपण कमी करू शकतो. "तूच तुझी वैरी" हे पालूपद आपण मोडून काढलयं आता जरा पुढचं पाऊल टाकूया. टी.व्ही.मालिकांवर होणारा वेळेचा अपव्यय व खुजी मानसिकता झुगारून परीवर्तन घडवूया.
       मैत्रिणींनो येत्या आठ मार्चपासून काही संकल्प करा व निर्धारानं पुर्ण करा. एकमेकींची उणीदुणी काढणे बंद करून एखादीच्या गुणाचे तोंडभरून कौतूक करा. चिंतातूर जंतू होण्याएवजी योगाभ्यास करा.  निव्वळ हेव्यापोटी खरेदी टाळून एखादे गुप्त व सत्पात्री दान करा. कौटूंबिक सहली नेहमीच करता एखादी " वूमेन स्पेशल टूर " अनुभवा. कर्मकांडाचा अतिरेक टाळून स्वतःचे हिमोग्लोबिन वाढवा. आवडता सिनेमा टॉकीजमधे जावून पहा. मुलांना बळजबरी अवांतर क्लासेसला न पाठवता तुम्हीच त्यांच्यासोबत खेळा व सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःवर प्रेम करा आणि हो पुढील महिलादिनाला मला आवर्जून तुम्ही तडीस नेलेला संकल्प कळवा, मी वाट बघतेय.

      जयश्री पाटील
      वसमत, जि.हिंगोली.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*स्त्रियांचा दर्जा उंचाविण्यासाठी.....*

" यत्र नार्यस्तु पुज्यन्ते, तत्र रमन्ते देवता " या संस्कृत भाषेतील सुवचनाचा अर्थ आहे ज्याठिकाणी स्त्रियांची पूजा केली जाते त्याच ठिकाणी देव रमतो. हे झालं त्या श्लोकाचा शब्दशः अर्थ परंतु प्रत्यक्षात त्याचा अर्थ असा आहे. ज्या घरात स्त्रियांची पूजा केली जाते म्हणजे स्त्रियांना मानाचे स्थान दिले जाते, त्यांच्या विचारांना वाव दिले जाते, त्यांचा मान ठेवला जातो आणि त्यांना समानतेची वागणूक दिली जाते, त्या घरात देव रमतो यांचा अर्थ त्या घरात शांतता व समृद्धी राहते. त्या घरची उत्तरोत्तर प्रगती होत राहते. वरील सुवचन आपणांस बऱ्याच ठिकाणी वाचण्यात येते. नेहमीप्रमाणे वाचन करणे आणि सोडून देणे यापलीकडे आपण काहीच करीत नाही हे ही सत्यच आहे. पुरातन काळापासून महिलाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो होता अजूनही बदललेला नाही हे वृत्तपत्रातून प्रकाशित होणाऱ्या छोट्या मोठ्या महिलांवरील अत्याचाराच्या बातम्यामधून कळून येते. आजही स्त्रियाना चूल आणि मूल या क्षेत्रापुरतेच बांधून ठेवले आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना आजही त्यांना त्यांचा दर्जा मिळालेला नाही. तेंव्हा त्यांचा दर्जा उंचाविण्यासाठी काय उपाययोजना करता येईल ? यांचा विचार करण्याची ही योग्य वेळ आहे असॆ वाटते. 
शनि मंदिराच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा यासाठी समाजात वादविवाद झाले आणि  न्यायालयाने महिलांच्या बाजूने निकाल दिला आहे. परंतु समाज तो निकाल मानण्यास तयार नाही. तेंव्हा प्रश्न असा पडतो की, महिलांना मंदिरात प्रवेश दिल्याने त्यांचे सर्व प्रश्न सुटणार आहेत काय ? याचा विचार करणे गरजेचे आहे. स्त्रियांवर होणारे अत्याचार, अमानुष छळ या विषयावर आंदोलने झाली असती तर कदाचित महिलांना मोकळा श्वास घेता आले असता.  स्वातंत्र्य पूर्व काळापासून ते आजपर्यंत स्त्रियांच्या समस्येवर सर्वांनी भरभरून लिहिले आहे मात्र समाजात आजही महिलांच्या समस्या काही कमी झाले नाहीत कारण या समस्यावर ठोस अशी उपाययोजना झालीच नाही. फक्त चर्चा आणि चर्चाच झाली. म्हणूनच उपायांची अंमलबजावणी करण्याची नितांत आवश्यकता आहे. संसारात पुरुष आणि स्त्री दोघांनाही समान महत्व आहे. रथाच्या चाकाप्रमाणे पुरुष आणि स्त्री हे एकमेकांना पूरक आहेत. एक जरी चाक खराब झाले तर ज्याप्रमाणे रथ चालत नाही अगदी तसेच पुरूष आणि स्त्रियांचे आहे. दोघांच्याही प्रगतीत एकमेकास असलेला आधार महत्वाचे आहे त्याशिवाय जीवनाची प्रगती शक्यच नाही. 
शिक्षणाने माणसाचा संपूर्ण विकास होतो हे यापूर्वी महात्मा फुले यांनी सांगितले आहे. शिक्षणामुळे व्यक्तींमध्ये आत्मविश्वास निर्माण होते. अन्यायाविरूध्द लढण्याची शक्ती मिळते. समाजात मान आणि सन्मान दोन्ही मिळतात. याचमुळे समाजात स्त्रियांचा दर्जा उंचाविण्यासाठी मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. त्याचसोबत याच शिक्षणाच्या माध्यमातून ते स्वतःच्या पायांवर उभे राहिले तर कोणत्याही संकटाला न डगमगता यशस्वीपणे सामोरे जाऊ शकतात. आज कित्येक स्त्रिया स्वतःच्या पायांवर उभे होत आहेत. त्यामुळेच समाजात त्यांचा दर्जा सुध्दा उंचावला जात आहे. त्यामुळे मुलींच्या शिक्षणाकडे सर्वांनी गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. प्राथमिक वर्गात शिकणाऱ्या मुलींची संख्या समाधानकारक आहे मात्र उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या संख्येत लक्षणीय फरक दिसते. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच मुली उच्च शिक्षण पूर्ण करतात, यांत बदल झाले पाहिजे. शासनाने सुध्दा मुलींच्या उच्च शिक्षणाकडे विशेष लक्ष देवून मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. प्रत्येक पालकांनी मुलींच्या शिक्षणाला प्रथम प्राधान्य द्यायलाच पाहिजे. मुलगा - मुलगी यांत भेद न मानता समान तत्वावर चालले पाहिजे असॆ वाटते. 
जी व्यक्ती पैसा कमाविते, त्यांस घरात, समाजात आणि गावात प्रतिष्ठा मिळते आणि आपल्या पुरूषप्रधान संस्कृतीमध्ये पैसा फक्त पुरुष कमावितो म्हणूनच त्यालाच प्रतिष्ठा मिळते, यांत काही चूक नाही. मग स्त्रियांनी देखील रोजगार किंवा नौकरी मिळविले आणि त्याद्वारे पैसे कमावू लागले तर समाजात, घरात आणि गावात त्यांची सुध्दा प्रतिष्ठा नक्कीच वाढू लागेल, यांत शंकाच नाही. यांचाच विचार करून प्रत्येकाने आपल्या बहिणीला किंवा मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल असॆ शिक्षण देऊन त्यांना रोजगार किंवा नौकरी करण्याची संधी दिली तर ते स्वतः प्रगल्भ होतील आणि त्यांची समाजातील पत वाढून दर्जा सुध्दा वाढण्यास मदत होईल. कायद्याने प्रत्येक क्षेत्रात महिलांना समान संधी देण्याची तरतूद केलेली आहे. आज नोकरी असो वा राजकारण तेथे महिला पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करताना दिसून येत आहेत. घराच्या उंबरठ्याच्या बाहेर पाऊल न ठेवणारी महिला आज रात्र पाळी च्या ठिकाणी काम करण्याची तयारी दर्शविते यावरून तिचा दर्जा उंचावला आहे असे नक्कीच म्हणता येईल. पण हे वर वर दिसणारे चित्र आहे. याच चित्राची दुसरी बाजू फारच भयानक आहे. आज बऱ्याच स्त्रिया  नोकरी किंवा इतर कारणाने घराबाहेर पडत आहेत, पुरुषा सारखे काम करून पैसा देखील कमावित आहेत मात्र तरी ही त्यांना त्यांच्या मनासारखे जीवन जगता येत नाही. नोकरी करावी महिलांनी आणि तिच्या पगारावर नियंत्रण पुरुषाचे. ATM सारख्या कार्डने पुरुषांना खूप  सोईचे केले आहे. नाही तर पूर्वी पैसे काढण्याच्या निमित्ताने बँकेत जायला भेटायचे. आत्ता ती ही सोय उपलब्ध नाही. काही महिलांची एवढी बिकट अवस्था आहे की ATM चा पिन क्रमांकदेखील त्यांना माहीत नसतो. मग आपल्या एवढ्या शिक्षणाचा आणि नोकरीचा फायदा तो काय ? इकडे राजकारणामध्ये ही महिलासाठी अच्छे दिन आहेत असे वाटत नाही. पुरुषांच्या बरोबरीने महिला देखील राजकारण मध्ये सहभागी व्हावे म्हणून त्यांना आरक्षण दिले आहे. त्याचमुळे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधानपदी श्रीमती इंदिरा गांधी विराजमान होऊ शकल्या. भारताच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपतीच्या पदावर श्रीमती प्रतिभाताई पाटील यांची निवड झाल्यावर सर्व महिलांना नक्की अभिमान वाटला असेल यात शंका नाही. भारतीय राजकारणात नाव घेण्याजोग्या अजून भरपूर महिला आहेत. जे की स्वबळावर पुढे आले आहेत. पण नेमके याच ठिकाणी आपल्या हातून चूका होतात आणि ग्रामपंचायतच्या सरपंचपदापासून ते महापालिकेच्या महापौरपदापर्यंत महिलांना संधी दिली जाते. मात्र याठिकानी त्या महिलांना निर्णय घेण्याची संधी फार कमी वेळा मिळते. कारण त्यांचे पतिदेव किंवा घरातील कर्तबगार पुरुष निर्णय घेत राहतो. महिलांना फक्त सहीपुरते सिमीत  ठेवल्या जाते. कळसूत्रीबाहुली प्रमाणे यांचे वागणे होऊन जाते. याठिकाणी एक गोष्ट खास करून नमूद करावेसे वाटते, सभापती किंवा अध्यक्ष पदावर महिला असेल तर त्यांचे पती किंवा इतर कोणी तरी पुरुष सर्व सूत्रे हातात घेऊन काम पाहतात. असेच जर एखादी महिला नोकरदार आहे, याठिकाणी त्या महिलेच्याऐवजी तिच्या पतीला किंवा घरातील एखाद्या पुरुषांना तिथे पाठविले तर याच लोकप्रतिनिधी मंडळीना ही बाब नक्की पटत नाही. असे का ? याचा ही जरा विचार करावा लागेल. नुकतेच पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका पूर्ण होऊन त्याचे निकाल देखील जाहीर झाले आहेत. बऱ्याच ठिकाणी सभापती, अध्यक्षा किंवा महापौर होण्याची संधी महिलांना मिळाली असेल. त्यांनी महिलांच्या आत्मसन्मानासाठी जरा विचार करावा. पुरुष मंडळीनी सुद्धा महिलेला मिळालेल्या संधीनुसार तिला मार्गदर्शन करावे आणि स्वतंत्र व्यवहार तिला करू दिल्यास काही तरी विकास नक्की होईल.
जुन्या विचारांचा पगडा डोक्यावर असल्यामूळे समाज आज सुध्दा त्या सनातन परंपरेत अडकून पडले आहे. महिला वर्ग या विचार पध्दतीत मोठ्या प्रमाणात दिसून येतात. श्रध्दा आणि अंधश्रद्धाच्या विळख्यातून महिला अजूनही बाहेर आले नाहीत. तेंव्हा महिलांनी आत्ता आपला समाजातील दर्जा वाढविण्यासाठी स्वतः प्रयत्न करणे सुध्दा तेवढेच आवश्यक आहे. समाजात एकाएकी असॆ बदल होणार नाही. त्यासाठी सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुरुष आणि स्त्रिया या दोघांनीही सामंजस्यपणे वागणे ही गोष्ट सुध्दा विसरून चालणार नाही. 

नागोराव सा . येवतीकर 
मु. येवती ता. धर्माबाद
nagorao26@gmail.com
••••••••••••••••••••••••••••••••••••••••

*अशी स्त्री - तशी स्त्री*

असं म्हणतात,स्त्रीच्या मनाचा थांग  कोणालाच लागला नाही. पण हे अर्धसत्य आहे. तसा मानवी  मनाचाच अर्थातच पुरुष असो अथवा स्त्री कोणाच्याही मनाचा थांग अजून लागलेला नाही. म्हणून 'जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती" हेच पटते. सर्वसामान्यपणे आपल्याकडे स्त्री-पुरुष भेद मांडताना स्त्रिया अशा आणि पुरुष असे आपण ढोबळमानाने वर्णन करत असतो परंतु "स्त्री" हा एक जरी घटक घेतला तरी प्रत्येक स्त्रीचा स्वभाव, राहणीमान, सहनशीलता, वैचारिक पातळी, आवडनिवड ही भिन्न असते. म्हणजे नोकरी करणारी स्त्री अशी, घरगुती स्त्री अशी, राजकीय स्त्री अशी, कामगार स्त्री अशी, निरक्षर स्त्री अशी असे आपण सामान्यपणे वर्गीकरण करत असलो तरी प्रत्येक वर्गातील स्त्री ही एकसारखी असूच शकत नाही. एकच म्हणू शकतो, स्त्री ही सबला आहे आणि तिचे कोणतेही रूप घेतले तरी अग्रेसरच ठरू शकते. ती आज कुठे मागे दिसत असेल तर  तिच्यात असणारा न्यूनगंड, परावलंबन आणि आळशी प्रवृत्ती याचमुळे! नाहीतर आजूबाजूला निरीक्षण केल्यास लक्षात येईल की, एखादी नोकरदार स्त्री पैसे कमविण्याशिवाय प्रत्यक्ष जीवनात जे कर्तृत्व करू शकणार नाही ते कर्तृत्व, धाडस एखादी निरक्षर स्त्री करताना दिसते.
     असे आजूबाजूला कितीतरी उदाहरणे पहावयास मिळतात की, स्त्री ही अबला नसून ती सबला आहे हेच सिध्द होत असते. माझ्या पहाण्यात एक शिक्षिका अशी आहे. जिचे लग्न झाले तेव्हा शिक्षण फक्त दहावीपर्यंतचे होते. लग्नानंतर एम. ए. एम. एड पर्यंत शिक्षण घेतले. त्या सकाळी चारला उठून अर्धा-एक तास योगाप्राणायाम करतात, एक तास जवळपास पाच-सहा वर्तमानपत्र वाचतात. त्यांच्या बागेत स्वतः पिकवलेल्या वेगवेगळ्या तीस प्रकारच्या भाज्या आहेत. खाण्यात कुठलेही भेसळीचे अथवा कृत्रिम अन्न न येण्याची काटेकोर काळजी घेते. घरी गायी-म्हशी पाळतात. जागोजागी जाऊन व्याख्याने देतात, बचतगटाच्या माध्यमातून अनेक स्त्रियांना रोजगार मिळवून देतात, स्काउट गाईडच्या त्या तज्ञ मार्गदर्शक म्हणून जिल्हाभर काम करतात. यासाठी त्यांना अनेक पुरस्काराने आजवर सन्मानित करण्यात आलेले आहे. आज वयाच्या ६५व्या वर्षीसुध्दा कामाचा अवाका अवाक करणारा आहे.
माझ्या पाहण्यात एक प्राथमिक शिक्षिका आहे. माहेरी लाडाकोडात वाढलेली. सिनेमा, नाटक पाहण्याची भारी हौस ! वडील जमीनदार असून नोकरी करत असल्याने घरी सगळी सुबत्ता ! तिचे लग्न बेरोजगार सुशिक्षित मुलाशी झाले. त्याचा पुरुषी अंह ! बायको नोकरीवाली आहे मग तिच्यावर आपलेच वर्चस्व असावे, या वृत्तीचा! लग्नाआधी तिचे वडील तिला पगार उचलण्यासाठी सुध्दा बॅंकेत जाऊ देत नव्हते आणि लग्नानंतर नवरा ! पगार कसा उचलतात, पगारातील डिडक्शन म्हणजे काय, अल्पबचत काय असते याबाबत ती पूर्णत: अनभिज ्ञ! हे  मला कळण्यासाठी एक छोटासा प्रसंग कारणीभूत ठरला. तो म्हणजे, एके दिवशी आम्हा दोघीना सोबत बाहेरगावी जाण्याचा योग आला होता. तिच्याजवळ त्यादिवशी बसच्या तिकिटाएवढे देखील पैसे नव्हते. मी कारण विचारल्यावर म्हणाली,"**चे पप्पाना आज पैसे मागितलेच नाही". मी अवाक ! कारण मी तिच्यापेक्षा वयाने कितीतरी लहान ! पण इतकी परावलंबी राहू नकोस, हे शहाणपण तिला  सांगण्याची माझ्यावर वेळ आली होती. हे बऱ्याचजणाना अतिशयोक्ती वाटू शकते, पण मी "याची देही,याची डोळा" घेतलेला हा स्वानुभव आहे. यापेक्षाही भयानक घटना तिच्या जीवनात घडलेल्या आहेत. परंतु मी तिला बरेच दिवस झालेत, मोकळ्या गप्पा मारल्या नाहीत. मला वाटते, कुठेतरी तिची ती परिस्थिती बदलली असेल.
             दुसरी स्त्री अशी आहे अगदी अक्षरशत्रू ! नातेवाईक म्हणाल तर जन्म देणारे आईवडीलही हिच्या लग्नाआधीच स्वर्गवासी झालेले. दुरच्या नात्यातील मामाने अल्पवयातच लग्न लावून दिलेले. घरी नवरा आणि सासू हा सुरुवातीचा परिवार ! नंतर मुलाच्या हव्यासापायी एकापाठोपाठ  चार मुलीच झालेल्या ! लोकांची धुणीभांडी करणे हेच उदरनिर्वाहाचे साधन !कारण नवरा मुळातच आजारी त्यात दारूचे व्यसन त्यामुळे तो फार अवजड कामे करू शकत नव्हता. तेवढ्यातच सासूचे निधन झाले. स्त्री-पुरुष हा भेदभाव नसलेले ते जोडपे. एकदा नवरा चहा करत होता तर ती एका बांधकामाचे खड्डे खोदत होती. नवरा जीवंत असण्याचा एकच उपयोग की,कपाळावर त्याच्या नावाने कुंकू लावता येते आणि तिच्याच शब्दात सांगायचे झाले तर "नवरा म्हणजे बाईला झाकण असतो" याउलट त्याच्या आजारावर इलाज करण्यातच तिची कमाई संपायची. तिच्या दुर्दैवाने अल्पावधीतच तिच्या नवऱ्याचे निधन झाले. लोकांच्या दृष्टीने ती अबला पण पुढच्या वैधव्याचा शाप पदरात पडल ती खचली नाही. तेवढ्याच ताकदीने ती सक्षमपणे,निर्भयपणे कोणाच्याही आधाराशिवाय चार पोरीना घेऊन उभी राहिली. आता तिला नवरा नव्हता पण नवऱ्याच्या आजारपणाचा खर्चही नव्हता. नवरा मरून सहा वर्षे झाली. आज तिने धुणीभांडी करूनच परंतु स्वाभिमानाने दोन मुलींची लग्न रितीरिवाजाप्रमाणे केली. दोन मुली शिकताहेत. कोणत्याच मुलींना काही कमी पडू देत नाही.प्रामाणिकपणे कष्ट करते. तिच्यावर कुठलेही कर्ज नाही उलट बॅंकेत आज तिची जमा रक्कम आहे.
तिच्या दृष्टीने ती यशस्वी स्त्री आहे. ती तिचे हक्क व कर्तव्य जाणून आहे. कुठे कामगारांच्या अन्यायाविरुद्ध असो अथवा वस्तीतील लोकांच्या अन्यायाविरुद्ध संघटित होणे असो, तिथे ही हजर असते. 
          अशा कमी शिकलेल्या, निरक्षर स्त्रिया सुध्दा जीवनातल्या संघर्षाला न घाबरता सक्षमपणे तोंड देऊन आज यशस्वी जीवन जगतात. ज्याना जागतिक महिला दिन काय आहे याची पुसटशी कल्पना देखील नाही. पण अशाही स्त्रिया आहेत ज्या नोकरी करतात, राजकारणात आहेत, त्यांना त्यांचे हक्क माहीत आहेत. तरी सुध्दा त्या आजही निर्णयक्षम नाहीत. अजूनही त्यांना बसस्टॅंडपर्यंत सोडायला, भाजी आणून द्यायला, बॅंकेत पैसे उचलायला नवराच हवा असतो आणि खेदाने म्हणावे वाटते, ह्या महिला आज 'जागतिक महिला दिन' साजरा करताना दिसतात. कोणाच्या हातून सन्मान म्हणून हारतुरे घेताना दिसतात. शिकलेल्या स्त्रिया का परावलंबी दिसतात ? समाजाभिमुख कार्यात पुढाकार घेण्याऐवजी पोथ्यापुराणात आणि टीव्हीवरील मालिकात अजूनही का अडकून पडल्या?
आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्रत्येक स्त्रीने आपण कुठे आहोत ? याची आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे.
स्वत:ला सजवण्यात,टीव्हीवरील मालिकात वेळ घालवण्यात, परावलंबी अशी ओळख पुसून सक्षम, सबला, कर्तृत्ववान अशी नव्याने ओळख निर्माण करण्याची वेळ आलेली आहे.

संगीता देशमुख, वसमत
९९७५७०४३११