नागोराव सा. येवतीकर

Friday, 7 October 2016

जीवन सुंदर आहे भाग चार

*जीवनातील यशस्वी पुरुष*
- नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद
  09423625769

दोन बायका एका छताखाली जीवन जगुच शकत नाहीत हे निर्विवाद सत्य आहे. मग त्या दोन बायका सासू-सुन असेल जावा-ननंद असो वा दोन जावा. ज्यांच्या घरात ही जोडी आनंदाने एकत्र राहतात असे दिसेल त्यांना उत्कृष्ट परिवार म्हणून घोषित करण्यास काही एक हरकत नाही. यांचे एकमेकांना कधीच
पटत नाही. कोणत्या ना कोणत्या कारणावरुन यांचे वाद आणि भांडण होत राहतात. त्यामुळे संपूर्ण कुटुंब व परिवार काळजी व चिंता ग्रस्त होऊन जातो. घरातील सदस्य म्हटल्यावर सर्वावर सारखेच प्रेम असते आणि हक्क सुद्धा सारखेच. एकीला बोलावे तर दुसरीला राग घरातील पुरुषाची अवस्था अडकित्यात सापडलेल्या सुपारी सारखी होते. काय करावे हेच सूचत नाही. इकडे आड आहे अन इकडे विहीर.
अश्या विपरित परिस्थिती मध्ये पुरुषाची खरी सत्वपरीक्षा ठरते. पुरुष शेवटी आपल्या आई-बहीन यांचेच ऐकतो बायकोचे काहीच ऐकत नाही असा आरोप सासरची मंडळी तिच्याकडून बोलताना करतात. पत्नी समजून घेईल या आशेवर पुरुष घरातील मंडळी कडून बोलते झाला की त्याची अवस्था धोबी का कुत्ता घर ना घाट का अशी होऊन जाते. एखाद्या घरात पुरुष आपल्या बायकोचे ऐकून वागतो तेंव्हा त्याला आपल्या जवळचीच मंडळी खुप नावे ठेवतात. हा बायकोचा ऐकणारा बाईलगा झालाय. बायकोपुढे याला काहीच दिसत नाही. लहानाचा मोठा केला तर साधी विचारपुस नाही की चौकशी नाही. असे वेगवेगळे आरोप आत्ता घरातील लोकच लावतात तेंव्हा पुरुषानी वागावे तरी कसे असा प्रश्न सतावितो. याच वैमनस्य मधून कुटुंबातील कलहाने एकाचा मृत्यू अश्या आशयाची बातमी वाचली की कुटुंबातील हे चित्र डोळ्यासमोर येते. वास्तविक पाहता बायकोला पुरुषानी विश्वासात घेऊन एकांतात जर समज दिली तर हे वाद मिटू शकतात. मी करतो मारल्यासारख आणि तू कर रडल्या सारख ही *सर्जिकल पध्दत* वापरली तर आपले जीवन यशस्वी होऊ शकेल.वाद विवाद भांडण तंटा प्रत्येकाच्या घरी आहे. असे एकही घर सापडणार नाही जेथे भांडण नाही. त्यामुळे घरातील समस्याचा निपटारा पुरुषानी योग्य प्रकारे हाताळणे आवश्यक आहे. अन्यथा आपल्या सुंदर जीवनाचे तीन तेरा वाजले म्हणून समजा.

🖊 नासा येवतीकर, धर्माबाद

Thursday, 6 October 2016

जीवन सुंदर आहे भाग तीन

*परिक्षेपेक्षा जीवन महत्वाचे*
- नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद
  09423625769
विद्यार्थ्याच्या जीवनातील एक महत्वाचा भाग म्हणजे परीक्षेत मिळविलेले यश. त्यासाठी तो वर्षभर जीव तोडून रात्रंदिवस अभ्यास करतो आणि केलेल्या अभ्यासाची दोन किंवा तीन तासात आपली स्मरणशक्ती पणाला लावून परीक्षा द्यायची. ती परीक्षा चांगली झाली तर विद्यार्थी खुश राहतो आणि तीच परीक्षा थोडी अवघड किंवा कठीण गेली असे वाटले की मुले नाराज होतात. त्यांचे कुठेही मन लागत नाही. निकाल लागण्यापूर्वीच "पेपर अवघड गेला म्हणून बारावीच्या विद्यार्थ्यांने केली आत्महत्या" अशी बातमी वृत्तपत्रात वाचायला मिळते. ज्या आई-बाबा नी मग ते गरीब असो श्रीमंत त्यांनी आपल्या भविष्याचा आधार म्हणून आपणास पालन पोषण केले आहे आणि एवढं शिक्षण पण दिले आहे. मी जर आत्महत्या केली तर माझ्या आई-बाबावर काय बितेल ? त्यांचे हाल कसे होतील ? आई-बाबा क्षणभरा साठी रागावतात कारण आपली मुले वाइट मार्गाला जाऊ नये, मुलांचे भविष्य उज्जवल व्हावे यासाठी प्रत्येक पालक धडपड करीत असतो. गरीब आई-बाबा तर आपल्या पोटाला चिमटा देऊन आपल्या शिक्षणावर पैसा खर्च करतात. फाटक के कापड वापरतात मात्र मुलांना सर्व हवे नाही ते बघतात. तेंव्हा खरोखरच विद्यार्थ्यांनी परिक्षेचा पेपर अवघड गेला किंवा परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून जीवन संपविणे योग्य आहे का ? याचा प्रत्येक विद्यार्थ्यांने विचार करणे आवश्यक आहे.
दहावी आणि बारावीची परीक्षा जीवनात अत्यंत महत्वाचे आहेत याबाबत काही दुमत नाही. ह्या परीक्षा जीवनाला वळण देतात त्यामुळे या कडे पालक आणि विद्यार्थी गांभीर्याने लक्ष देतात नव्हे दिलेच पाहिजे. परंतु त्याची तयारी फक्त दहावी किंवा बारावीच्या वर्षात करून चालणार नाही हे ही लक्षात घ्यावे. प्राथमिक वर्गापासून मुलांच्या अभ्यासाकडे पालकानी लक्ष द्यायला हवे. मुलांना दडपण वाटेल अशी आपली वागणूक मुलांच्या आयुष्यासाठी घातक ठरु शकते. मुलांची आवड निवड लक्षात घेऊन त्यांच्या सोबत मैत्रीपूर्वक वागल्यास मुले आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलणार नाहीत. विद्यार्थ्यांनी सुद्धा पालकांच्या आणि परिवारातील सर्व सदस्यचा विचार करून आपले वर्तनुक ठेवावी. एका परीक्षेत अपयश मिळाले म्हणून नाराज न होता कश्यामुळे अपयश मिळाले याचा मागोवा घेऊन त्रुटी पूर्ण करावे आणि पुन्हा नव्या जोमाने परिक्षेला तोंड द्यावे. त्यावेळी जे यश मिळेल त्याची जीवन भर संपणार नाही. आपल्या हातून एक सुंदर विश्व निर्माण होणार आहे आणि त्याचे श्रेय अर्थातच आपणास मिळणार आहे. तेंव्हा चला कवी केशवसुत यांचे कवितेतील ओळी सदा स्मरणात ठेवू या " जुने जाऊ द्या मरणालागुनी जाळुनी किंवा पुरुनी टाका"

🖊 नासा येवतीकर, धर्माबाद

जीवन सुंदर आहे भाग दूसरा

*आत्महत्या हा पर्याय नाही*
🖊 नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद
     09423625769

शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा सध्या समाजात असलेली एक मोठी समस्या बनून पुढे येऊ पाहत आहे. सरसरी दररोज तीन शेतकरी विविध कारणामुळे मृत्यूला जवळ करीत आहेत. शेतकऱ्यांना निसर्गाची ही साथ मिळत नाही ना सरकारची साथ यामुळे तो समस्याग्रस्त बनत चालला आहे आणि त्याच विवंचणेत आत्महत्या शिवाय दूसरा पर्याय त्याला सुचेना झाले. यावर्षी शेतात भरघोस पीक येईल आणि डोक्यावर असलेले कर्ज संपून जाईल या विचारात दरवर्षी नव्या उमेदीने तो शेतात राबतो पण त्यांच्या कपाळी सुख लिहिलेले नाही तर कसे सुख मिळणार ? घरात खाणारी तोंडे जास्त आणि कमविणारा मात्र तो एकटा त्यामुळे घराचा पूर्ण भार त्याच्यावर असणार हे ठरलेले आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी त्यांना कुटुंबातील, परिवारातील आणि मित्राचा आधार असायला हवे. आज ना उद्या समस्या संपतील या आशेवर जगणे आवश्यक आहे, मात्र चिंता ही स्वस्थ बसू देत नाही. पण खरोखर आपण आत्महत्या केली आणि आपले जीवन संपविले तर आपल्या समोर ज्या काही समस्या होत्या त्यापासून आपली कायमची सुटका होईल मात्र त्याच समस्या आपल्या कुटुंबातील आणि परिवारातील सदस्यना अजून गंभीर स्वरुपात भेडसावते याचा एक वेळ विचार केलाय का ? नाही. जीवनातील कोणत्याही समस्यावर आत्महत्या किंवा जीवन संपविने हा पर्याय होऊच शकत नाही. त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्या डोक्यावरील कर्जाचा किंवा शेतातील नापिकीचा जास्त डोक्यात न घेता काम करीत रहा. भगवान के पास देर है मगर अंधेर नहीं ही गोष्ट लक्षात ठेवा.
जीवन खूप सुंदर आहे, त्याला फक्त योग्य दिशेने चालण्याचा प्रयत्न करीत रहावे. फक्त शेती न करता त्यासोबत काही लघू उद्योग करता येईल काय याचाही विचार करून तसा जोड व्यवसाय केल्यास आपल्या जीवनाला नक्कीच उभारी मिळेल. आज दुधाचा व्यवसाय करणारी शेतकरी मंडळी झालेला नुकसान दुसऱ्या व्यवसायतुन भरून काढू शकतात आणि त्यासाठी आपणास काही वेगळी प्रक्रिया करावे लागत नाही. शेळीपालन व्यवसाय ही आपणाला अगदी सहजपणे करता येईल त्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही. असे काही व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्यांनी विचार केल्यास हे जीवन किती सुंदर आहे याची प्रचिती येईल.

🖊 नासा येवतीकर, धर्माबाद

जीवन सुंदर आहे

..... *जीवन सुंदर आहे* ......
- नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद
   09423625769
"या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे" हे रेडियो वरील गाणे ऐकत असतानाच एक बातमी वाचण्यात आली. एका वीस वर्षीय युवतीने नदीत उडी मारुन आत्महत्या केली. त्या बातमीने रेडियो वरील गाण्याचे माझे लक्ष पार उडून गेले आणि त्या मुलीच्या अश्या कृतीने तिच्या आई-बाबावर आणि त्या परिवारावर काय प्रसंग ओढवाले असेल याची साधी कल्पना जरी केली तरी ह्रदय धडधड करायला लागले, छातीचे ठोके वाढले. नेमके आयुष्याला आत्ता सुरुवात होऊ लागली होती आणि तिने आपल्या हाताने आपले आयुष्य नष्ट करून टाकली.

जीवन सुंदर आहे ते जगता आले पाहिजे असाच काहीसा संदेश त्या गितातून देण्याचा कवीचा प्रयत्न आहे. आपण जीवन जगण्याचा कधीही मनातून प्रयत्न करीत नाही. आपण आपली जीवन क्रिया समजून घेतली नाही त्यामुळे त्याचा त्रास आपणास नक्की होतोच. त्यासाठी सर्व प्रथम आपण आपल्या परीने आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्नच करायला हवा. फार लवकर हताश होणे, नाराज होणे यामुळे मनात नैराश्य निर्माण होते. मग आपले विचार एका वेगळ्याच दिशेने धाव घेते. मनात न्यूनगंड निर्माण होते. त्या मुलीला घरात काही त्रास होता का ? नव्हता ? हे प्रश्न महत्वाचे नाही तर या टोकापर्यंत ती का गेली ? याचा ही विचार केला पाहिजे. वास्तविक पाहता अश्या घटना सहजासहजी किंवा एका क्षणी घडलेल्या नसतात तर खुप दिवसापासून त्यांच्या मनात याची सल बोचत असते. वारंवार त्याच विषयावर चिंतन करून मन बधीर होत राहते आणि असे पाऊल उचलले जाते.
त्यामुळे कुटुंबात वादविवाद, भांडण असे प्रकार शक्यतो होऊ देऊ नये. घरातील सर्वाशी प्रेमाने वागत रहावे शक्यतो या गोष्टी पाळले तर असे प्रकार होत नाहीत. मुलींनी सुद्धा फार लहान गोष्टी मनावर न घेता सामंजस्यपणाने विचार करून परिवारामध्ये आंनदी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करावा. मग पहा खरोखरच जीवन सुंदर असल्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही.

- नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद