नागोराव सा. येवतीकर

Wednesday, 7 September 2016

दफ्तराच्या ओझ्यापासून सुटका


*दफ्तराच्या ओझ्यापासून सुटका*

असोसिएटेड चेंबर्स आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आॅफ इंडिया (असोचेम) समितीमार्फत देशात नुकत्याच केलेल्या पाहणीत १३ वर्षांखालील ६८ टक्के शाळकरी मुलांना सौम्य स्वरूपाची पाठदुखी असल्याचे आढळले आहे. दप्तराचे ओझे वाहून ७ ते १३ वयोगटातील ६८ टक्के शाळकरी मुलांना पाठदुखी आणि कुबड येण्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. पाहणी अहवालात असे म्हटले आहे की, ७ ते १३ वयोगटातील ८८ टक्क्यांपेक्षा जास्त शाळकरी मुले त्यांच्या वजनाच्या ४५ टक्के वजन पाठीवर वाहून नेतात. मुलांच्या दफ्तराच्या ओझ्याविषयी यापूर्वी सुध्दा राज्य सरकारने उपाय योजना कराव्यात असे उच्च न्यायलयाने निर्देश दिले आहेत. यावर शासनाने परिपत्रक काढून मोकळे झाले परंतु त्याची अंमलबजावणी कश्याप्रकारे होत आहे याची खातरजमा अजून पर्यन्त केली नाही. मुलांच्या दप्तराचा कायदा २००६ नुसार दप्तराचे ओझे मुलाच्या शरीराच्या वजनाच्या 10% पेक्षा जास्त असू नये. असा नियम असून ही या नियमची कोठेही प्रभाविपणे अंमलबजावणी होत नाही. मुलांच्या पाठीवरील दफ्तराचे ओझे कसे कमी करावे याबाबत शाळाप्रमुखांनी उपाय योजना करणे आवश्यक आहे.
दफ्तरमध्ये आवश्यक बाबी म्हणजे सर्व विषयाची पुस्तके, विषयाच्या वह्या, रफ वही, स्वाध्याय पुस्तिका, जेवणाचा डबा हा विना अनुदानित शाळेतील मुलांसाठी आणि पाण्याची बाटली ह्या सर्व बाबीचा विचार केल्यास नक्कीच दफ्तराचे ओझे वाढणार यात शंकाच नाही. यावर खालील उपाय करता येतील असे वाटते. प्रत्येक शाळेत लॉकर जरी उपलब्ध करून दिल तरी मुलांच्या पाठीवरील दफ्तराचे ओझे कमी होईल असे वाटत नाही. काही जण यासाठी टैब चा पर्याय सुचवतता मात्र ती खर्चिक बाब आहे. सर्वाना टैब पुरवठा करणे मोठे अवघड काम आहे. त्यासाठी स्वस्त आणि सुलभ उपाय योजले तर त्याचा फायदा राज्यातील सर्व मुलांना होऊ शकते. राज्यात आज मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, परिसर अभ्यास भाग एक आणि दोन असे सहा विषय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केले आहेत.


* वारनिहाय विषयाच्या वहीचा वेळापत्रक तयार करणे

मुले विषयच्या वह्या रोजच्या रोज ने आण करतात. याचा भार आपणाला सहज कमी करता येतो. सहा दिवसाचे सहा विषय आणि आणि त्याच दिवशी ते वह्या तापसण्याचे काम केल्यास बरेच काम सुलभ होते आणि दफ्तराचे ओझे सुध्दा कमी होईल. यामुळे मुलांना चांगला वेळ मिळतो आणि यात सातत्यपणा येईल. सध्या प्रचलित पद्धतीनुसार धडा संपला की गृहपाठाची वही पूर्ण करणे आणि सर सांगतील त्यावेळी दाखविण्याची ही प्रथा आत्ता जुनी झाली त्यात काही बदल करणे आवश्यक आहे. तेंव्हा वार निहाय वह्याचे नियोजन नक्की फलदायी ठरेल असे वाटते.

* वार निहाय विषयाचे नियोजन

ज्या पद्धतीने वार निहाय विषयाच्या वह्याचे नियोजन केल्या आहे त्याच पध्दतीने जर वारनिहाय विषय नियोजन केल्यास दफ्तराचे ओझे बऱ्याच अंशी कमी होईल असे वाटते. आपण विषयाच्या तासिका, भारांश या सर्व बाबीचा विचार करून एका दिवसात सर्व विषयावर अध्यापन करतो. घरी गेल्यानंतर मुलांना सर्व विषयांचा आढावा घेताना नाकी नऊ येतात आणि राहिलेला अभ्यास कधी करावा ? हा प्रश्न पडतो. त्याऐवजी एका दिवशी एक विषय दिवसभर अध्यापन केले तर मुलांना त्याच विषयावर भर देता येते. विषयाची एकच लिंक असते. शिक्षक सुद्धा या पध्दतीने आपल्या विषयाला न्याय देऊ शकेल. सकाळच्या सत्रात विषयाचे अध्यापन करता येईल आणि दुपारच्या सत्रात त्याच विषयाशी संबंधित पश्नोत्तर किंवा स्वाध्याय सोडवून घेतल्यास खूप फायदा मिळू शकतो. विद्यार्थी च्या गुणावत्तेत ही वाढ होते. यामुळे मुलांच्या दफ्तरात एक पुस्तक एक वही बाकी इतर साहित्य राहील म्हणजे वजन किती कमी होईल याचा आपण अंदाज लावू शकतो. पण ही पध्दत एका शिक्षकाने एका शाळेत राबवून चालणार नाही. राज्यातल्या सर्व शाळेत ही पद्धत चालू केली तर मुलांचे आरोग्य वाढेल ते निरोगी राहतील. सायकल चालवित पाठीवर दफ्तराचे ओझे घेऊन शाळेला जाणाऱ्या मुलांची अवस्था तर खुपच वाइट आहे, बिकट आहे.



*बिन दफ्तराची शाळा

महिन्यातुन एक किंवा दोन दिवस मुलांना दफ्तर विना शाळेत बोलावावे. त्यादिवशी मुलांसोबत गप्पा-टप्पा आणि अवांतर चर्चा करावी. आठवडाभर शिकवलेल्या भागावार औपचारिकपणे प्रश्नउत्तर विचारावे. प्रश्नमंजुषा सारखे उपक्रम राबाववे. निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गायन स्पर्धा यासारखे कला प्रदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात यावे. एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी डबा पार्टी करावी, क्षेत्रभेट करावे, अश्या दफ्तराविना शाळेत आल्यामुळे मुले आनंदात शाळेत येतात आणि त्यांना शाळेचा लळा ही लागेल. विशेष म्हणजे त्याच्या पाठीवर एका दिवसाचे दफ्तराचे ओझे राहणार नाही. 

पाठीच्या वाढत्या तक्रारींचा आणि मणक्याचा आकार बदलण्याचा संबंध हा अतिरिक्त आणि असमान ओझ्याशी आहे. त्यामुळे मणक्याची गंभीर स्वरूपाची हानी होते आणि अनेकदा बरे न होणारे पाठीचे दुखणे बळावते. कमी वयात मणक्यांना आलेली सूज, स्लीप डिस्क, सततची पाठदुखी, मणक्याची लवकर झीज होणे आदी तक्रारी मुलांना आहेत, असे असोचेमच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष बी. के. राव यांनी सांगितले.

मुलांच्या दफ्तराच्या अतिरिक्त ओझ्यामुळे येणाऱ्या ताणाने मुलांच्या मस्कोक्युलेटल सीस्टिमच्या वाढीवर परिणाम होतो. असे तज्ञ डॉक्टर चे म्हणणे आहे. या सर्व बाबीचा विचार करून आत्ता पालकांनी शाळेकडे मुलांच्या पाठीवरील ओझे कमी करण्याविषयी आग्रहाची मागणी लावून धरून त्याचा पाठपुरावा करणे सुद्धा आवश्यक आहे अन्यथा भविष्यात आपली मुले निरोगी राहतील ? याची खात्री नाही

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
nagorao26@gmail.com



==========================


साक्षरता दिन

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस - 08 सप्टेंबर