नागोराव सा. येवतीकर

Saturday, 20 February 2016


* शेतकऱ्यांना जगवायचे असेल तर . . . .  *

- नागोराव येवतीकर, मु. येवती  ता. धर्माबाद 

    9423625769

भारतातील जवळपास ७५ टक्के जनता खेड्यांत राहते. लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती म्हणूनच भारत देश कृषिप्रधान आहे असे म्हटले जाते. भारतातील संपूर्ण व्यवहार हा शेतीवरच अवलंबून आहे. शेतातून निघणा-या उत्पादनावरच भारताचा विकास अवलंबून आहे. इतरांना जगवणारा, उत्पादक असा शेतकरी मात्र फारच बिकट अवस्थेत दिसून येतो. कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितेतील ओळीनुसार शेतकरी हा उभ्या जगाचा पोशिंदा आहे. मात्र त्याच्याच पदरात धोंडा का पडतो? हे एक न सुटणारे कोडे आहे. जगाचे पालनपोषण करणारा शेतकरी मात्र महागाईच्या आगीत होरपळून निघत आहे. कर्जाच्या डोंगराखाली दबला जात आहे. त्याचबरोबर याच शेतातील उत्पादनावर व्यापार करणारी मंडळी महालातील पंख्याखाली बसून भरपूर पैसा कमवित आहेत आणि शेतात दिवसरात्र काबाडकष्ट करणारा शेतकरी मात्र हलाखीचे जीवन जगत आहे.
शेतकरी मंडळींना ना निसर्गाची साथ ना सरकारची, त्यामुळे त्यांच्या पदरात दरवर्षी निराशाच येते. पावसाळा आला की, नव्या दमाने, नव्या उत्साहाने तो कामाला लागतो. मात्र त्याच्या उत्साहावर निसर्ग कायम पाणी टाकतो. वेळेवर पावसाचे पाणी पडत नाही मात्र केलेल्या कामावर पाणी टाकायला विसरत नाही. शेतातून निघणा-या उत्पादनांवर भरवसा ठेवून शेतकरी आपले कौटुंबिक व्यवहार पूर्ण करतो आणि ऐनवेळी निसर्गाकडून त्यास फटका बसतो. त्यामुळे त्याच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर वाढत जातात व एक दिवस अशी परिस्थिती येते की, शेतक-यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्यायच दिसत नाही. एका वर्षात कोणत्या भागात किती शेतक-यांनी आत्महत्या केल्या? हे महत्त्वाचे नाही.
महत्त्वाचे आहे ते शेतकरी आत्महत्या का करतो?
निसर्गाची साथ- भारतात प्रामुख्याने दोन प्रकारची शेती केली जाते. एक म्हणजे जिरायती अर्थात कोरडवाहू आणि दुसरी बागायती. देशात दुस-या प्रकारापेक्षा पहिल्या प्रकाराची शेती करणा-यांची संख्या जास्त आहे. निसर्गावर आधारित शेती करावी लागते, त्यामुळे त्याचे जीवन बेभरवशाचे असते. शेतकरी पै-पै गोळा करून बी-बियाणे, खते व औषधी खरेदी करतो आणि शेतात टाकतो. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे एक तर त्याला आकाशाकडे डोळे लावून बसावे लागते किंवा अति पावसामुळे पाऊस थांबण्याची वाट पाहावी लागते. काही का असेना फटका मात्र शेतक-यांनाच बसतो. सध्या तरी कोरडवाहू शेती करणे म्हणजे एक जुगारच आहे. लागली लॉटरी तर लागूनच जाते अन्यथा बरबादच. नशिबाने साथ दिली तरच शेतात टाकलेले बी-बियाणे, खते, औषधे आणि श्रम यांना फळ मिळते. नाही तर खर्च झालेली मुद्दल रक्कमसुद्धा त्यास परत मिळत नाही. शेतक-यांसोबत दरवर्षी असेच घडते. त्यामुळे त्याच्या पदरात नेहमीच निराशा पडते.
शेतक-याचे जीवनमान, त्याचा जीवन जगण्याचा स्तर उंचवायचा असेल तर सर्वप्रथम त्याची शेती निसर्गावर अवलंबून राहू नये अशी परिस्थिती निर्माण करावी. निसर्गाचा लहरीपणा निर्माण केला आपणच आणि त्यास अटकाव करण्याची जबाबदारी आपणावरच आहे. पाऊस पडणे वा न पडणे हे सरकारच्या हाती नाही. पाण्याचे योग्य नियोजन करणे, वृक्षलागवड करून वृक्षसंवर्धन करणे इत्यादी साधे उपाय करणे आवश्यक आहे. वृक्षांमुळे पाऊस पडतो हे आता सर्वज्ञात झाले आहे. उघड्या जागेवर, माळरानावर, टेकड्यांवर जास्तीत जास्त वृक्ष कसे जगविता येतील याचा प्रत्येकाने विचार करणे आवश्यक आहे. निसर्गाची शोभा व पर्यावरण संतुलन कसे राखता येईल यावर विचार झाला पाहिजे.
* शेतक-यांच्या उत्पादनाला हमी भाव
शेतकरी जीवनावश्यक अशा अनेक अन्नघटकांचे उत्पादन करतो. संसार चालविण्यासाठी पैशाची आवश्यकता भासते त्यामुळे तो आपला उत्पादित माल बाजारपेठेत विक्रीसाठी आणतो. मात्र बाजारपेठेतील मागणी व पुरवठ्याच्या गणितात शेतक-यांना नेहमीच फटका बसतो. जेव्हा शेतक-याजवळ शेतमाल असतो त्यावेळी बाजारात भाव कमी असतो आणि व्यापारी मात्र साठवणूक करून चढ्या भावाने विक्री करतात. दरवाढीचा खरा फायदा शेतक-यांना होण्याऐवजी तो दलालांना व व्यापा-यांनाच जास्त होतो. त्यामुळे अन्नधान्य उत्पादन करणारा पोशिंदा कंगाल बनत चालला आहे तर त्याच्या उत्पादनावर जगणारी बांडगुळे श्रीमंत होत आहेत. तेव्हा शासनाने या प्रश्नाविषयी गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. बाजारपेठेत व्यापारी वा दलाल लोकांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी प्रत्येक शेतक-याला आपला उत्पादित माल साठविता येईल अशा शीतगृह कोठारांची गावोगावी निर्मिती करावी. मध्यस्थाच्या मदतीने चालणारा व्यवहार बंद करून शेतक-यांच्या प्रत्येक उत्पादित मालाचे शासनाने हमी भाव अगोदरच जाहीर केल्यास शेतक-यांची लूट होणार नाही. उत्पादित मालाची नोंदणी शेतक-यांच्या नावे करण्यात यावी ज्यामुळे शेतकरी विक्री करताना तूरडाळीची किंमत ३५ रु. प्रति किलो आणि व्यापारी विक्री करताना ८० रु. तर या वाढीव रकमेतून निदान ५० टक्के रक्कम शेतक-यांना मिळावी असा कायदा तयार केल्यास शेतक-यांचा नक्कीच फायदा होईल. शेतक-याच्या हातून एकदा माल गेला की त्यावर त्याचे कसल्याच प्रकारचे नियंत्रण नसते.बाजारात सध्या असलेली ही विषमता दूर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बाजारपेठेतील शेतक-यांच्या उत्पादित मालाचे सर्व व्यवहार कृषि उत्पन्न बाजार समितीमार्फतच व्हावेत. बाजारपेठेत शेतक-यांच्या मालाची बोली लावण्याची पद्धत सर्वप्रथम बंद करावी. उत्पादित मालाला वेगवेगळ्या प्रकारची नावे ठेवून दलाल मंडळी एकाच प्रकारच्या उत्पादनाला दर तासाला किंवा दिवसागणिक वेगळेच भाव लावतात. अशा या लिलाव प्रक्रियेमुळे शेतकरी हवालदिल होतो. त्याऐवजी स्थिर भावात खरेदी-विक्री झाल्यास शेतक-यांना आपल्या उत्पादित मालाविषयी विश्वास वाटतो. व्यापारी किंवा दलाल मंडळींना फाटा देऊन ज्याप्रकारे पणन महासंघ कापूस खरेदी करते त्याच धर्तीवर सर्व उत्पादित माल जसे की, तूर, मूग, उडीद, सोयाबीन इत्यादी सर्व वस्तू शासनाने खरेदी कराव्या व एकच हमीभाव जाहीर करावा म्हणजे शेतकरी विश्वासपूर्वक जगू शकेल.
* जोडधंदा करण्यासाठी अनुदान द्यावे
शेतीला पूरक असा जोडधंदा असेल तर शेतातून झालेले नुकसान या व्यवसायातून भरपाई करता येऊ शकते. पश्चिम महाराष्ट्र, खानदेश किंवा कोकण विभागातील शेतकरी शेती या मुख्य व्यवसायासोबत पशुपालन, शेळीपालन किंवा इतर जोड व्यवसाय करतो. ज्यामुळे त्याला आर्थिक चणचण भासत नाही किंवा ऐनवेळी कोणाकडे जावे लागत नाही. याच जोडधंद्याची उणीव मराठवाड्यासारख्या मागासलेल्या भागात दिसून येते. येथील शेतक-यांची नुकसानभरपाई कोणत्याच मार्गाने होत नाही.
२०-२५ वर्षांपूर्वी प्रत्येकाच्या घरी एक तरी दुभते जनावर असायचे ज्यामुळे दूध त मिळतच होते शिवाय दुग्धजन्य पदार्थही घरीच मिळत होते. त्याचसोबत जनावरेही वाढत होती. मात्र ५-१० वर्षांपासून जनावरांची संख्या कमी झाली. जेथे दुधाची गंगा वाहात होती तेथील लोकांना चहासाठी जेवढे दूध लागते तेवढ्या दुधासाठी मोताद होण्याची वेळ आली. एवढी विपरीत स्थिती का निर्माण झाली? शासनाने वेळीच यावर उपाययोजना आखली नाही. शेतक-यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी केली. याने आत्महत्या थांबल्या का? नाही. उलट वाढतच गेल्या. याव्यतिरिक्त शासनाने प्रत्येक शेतक-याला पशुपालन, शेळीपालन वा इतर जोड व्यवसाय उभारणीसाठी सबसिडीच्या स्वरूपात किंवा कर्जाच्या स्वरूपात रक्कम दिली असती तर लाखो शेतक-यांच्या हाताला काम मिळाले असते, गावात समृद्धता वाढली असती. शेतक-यांची नुकसानभरपाई झाली असती, त्याचसोबत धवलक्रांतीही घडली असती. काही लघुउद्योगांसाठी जरी कर्जपुरवठा झाला असता तर त्याच्या मानसिकतेत बदल झाला असता. परंतु कर्जमाफी करून शेतक-यांना आळशी बनविले.
फुकट मिळालेल्या पैशातून दारू, जुगार या बाबींवर खर्च करणा-यांची संख्या कमी नाही. एक प्रकारे शासनाने लोकांना फुकट जगविण्याचा जणू विडा उचलला आहे असे दिसते. नुकतेच पारित करण्यात आलेले अन्न सुरक्षा विधेयक २०१३ मधून एक चित्र ठळकपणे दिसत आहे. भविष्यात शेतकरीवर्गास शेतात काम करण्यासाठी जे काही मजूर लागतील ते अव्वाच्या सव्वा दरात मिळवावे लागतील आणि कदाचित मजूर मिळणारही नाहीत. कारण या विधेयकानुसार देशातील अर्ध्या जनतेला कमी दरात अन्नधान्य मिळत असेल तर ते काम का करतील? आज अंत्योदय योजनेतून जे सूक्ष्म चित्र दिसत आहे या योजनेतून अगदी ठळक दिसेल. यापेक्षा शासनाने शेतक-यांच्या उत्पादित मालाला संरक्षण व हमी भाव दिला असता तर फार बरे झाले असते.

~~~~~~~ΦΦΦΦΦΦΦ~~~~~~~

Friday, 19 February 2016



* सरकारी शाळा कात टाकतंय ...... *


जिल्‍हा परिषदेच्‍या सरकारी शाळा म्‍हटले की, प्रत्‍येकांच्‍या डोळ्यासमोर एक वेगळेच चित्र उभे राहते. ज्‍या चित्रात त्‍या शाळाची, तेथील परिसराची, शिक्षकांची आणि विद्यार्थ्‍याच्या बाबतीतचे चित्रण भयानक दिसून येते. या शाळांची स्थिती कधीच सुधारणार नाही, अशी धारणा प्रत्‍येकाची बनलेली आहे. या शाळांत फक्त गरिबांची मुलेच शिकतात म्‍हणून यास गरिबांची शाळा असे सुध्‍दा संबोधले जाते. सरकारी यंत्रणेमार्फत चालविण्‍यात येणारी ही स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेच्‍या नियंत्रणाखालील जिल्हा परिषदेची शाळा प्रत्‍येक गावात आढळून येते. कारण ‘गाव तेथे शाळा” या संकल्‍पनेत प्रत्‍येक गावात, वाडी-तांडयात, डोंगर, कपा-यात, दरी खो-यात प्राथमिक शाळा सुरू करण्‍यात आल्‍या. सहा ते चौदा वयोगटांतील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी वेगवेगळया योजना राबवून जसे की महात्‍मा फुले शिक्षण हमी योजना, साखर शाळा, राजीव गांधी निवासी व अनिवासी सेतू शाळा, वस्‍ती शाळा, हंगामी स्‍थलांतरित पालकांच्‍या मुलांसाठी वसतीगृह इत्‍यादी योजनेतून शासनाने मुलांना शिक्षणाच्‍या प्रवाहात ठेवण्‍याचा प्रयत्‍न केला. भारत प्रजासत्ताक होतांना भारतात मोठ्या प्रमाणात निरक्षर लोकांची संख्‍या होती, ती भारत सरकार समोर एक फार मोठे आव्‍हान होते.  स्‍वत: निरक्षर असल्‍यामूळे त्‍यांनी आपल्‍या मुलांच्‍या शिक्षणाकडे ही लक्ष दिले नाही. त्‍यामूळे दुसरी पिढी सुध्‍दा निरक्षरतेच्‍या खाईत लोटली गेली. त्‍यानंतरची पिढी मात्र शिकून सवरून साक्षर झाली, नोकरी लागली आणि समृध्‍द बनली. त्‍यामुळे आज शाळेत दाखल होणा-या  मुलांचे पालक जवळपास नव्‍वद टक्के साक्षर, समजूतदार सजग व शिक्षणाला महत्‍व देणारे आहेत.  ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्‍यासाठी जिल्‍हा परिषदेच्‍या सरकारी शाळेशिवाय पर्यायच नसतो.  काही श्रीमंत किंवा पैसेवाले मंडळी आपल्‍या पैशाच्‍या बळावर शेजारच्‍या इंग्रजी शाळेत आपल्‍या मुलांना  पाठवितात. सरकारी शाळेत काहीच शिकविले जात नाही, असे टोमणे या सरकारी शाळांसाठी वशिला पुजेलेले आहे. त्‍यात या पालकांना दोष देऊन चालणार नाही. कारण तसे वास्‍तव त्‍यांना कुठेनकुठे दिसते. गव्‍हासोबत किडे रगडण्‍याच्या  प्रकारामूळे चांगल्‍या असलेल्‍या शाळा आणि विद्यार्थी सुध्‍दा या चूकीच्‍या रांगेत नेऊन बसविले जाते. वास्‍तविक पाहता सरकारी शाळा एवढ्या वाईट नव्‍हते किंवा नाहीत, सध्या वर्ग एक किंवा दोन पदावर काम करणा-या अधिका-यांचे प्राथमिक शिक्षण कोठून पूर्ण झाले ? या प्रश्‍नांच्‍या उत्‍तरांतून कळेल की, ते सर्व जिल्‍हा परिषदेच्‍या सरकारी शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले आढळून येतील.
ज्‍याकाळी शिक्षणाच्‍या प्रचार आणि प्रसार म्‍हणावा तेवढा झाला नव्‍हता त्‍या काळात शाळेतून शिकवायला गुरूजी मिळत नसायचे, हा एक गंभीर प्रश्न होता. असाच प्रसंग महात्‍मा ज्‍योतिबा फुले यांना सन 1848 मध्‍ये जेंव्‍हा पुण्‍यातील भिडेच्‍या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली होती, त्‍यावेळी त्‍यांच्‍या समोर हा प्रश्‍न राहिला होता. मात्र त्‍यांनी स्‍वत:ची पत्नी सावित्राबाई फुले यांना यासाठी तयार केले आणि देशातील पहिली महिला शिक्षिका बनण्‍याचा मान त्‍यांना मिळाला परंतू शासन इथे तसे करू शकत नाही. त्यांच्यावर काही बंधन असतात, नियम असतात. उत्‍तम शेती, मध्‍यम व्यापार, आणि कनिष्ठ नोकरी या त्रिसुत्रीच्‍या विचारधारेत असलेल्या मंडळीनी त्यांकाळी शिक्षकांची नोकरी करण्‍यास तयार नव्हती. त्या मंडळीना आजही या घटनेचा पश्चात्‍ताप होत असे आढंळून येते. कारण त्यांच्या सोबतची मंडळी शिक्षकाची नोकरी करीत आज सुखात आहेत. पंचवीस - तीस वर्षापूर्वी प्रत्‍येक गावात रस्‍ता आणि वीज पोहोचली नव्‍हती त्‍यामूळे शिक्षक सुध्‍दा पोहोचले नव्‍हतेच किंवा त्यांचे प्रमाण कमी होते. चिखलाचा रस्‍ता तुडवित, एका हातात धोतराचा सोगा अन दुस-या हातात चपलांचा जोडा आणि मानेवर  लांब छत्री अडकवुन आठवडयातल्‍या पहिल्‍या दिवशी सोमवारी गुरूजी शाळेत यायचे. हात-पाय स्‍वच्‍छ धुऊन झाले की, शाळेकडे म्‍हणजे एकच वर्गखोली त्‍यात प्रवेश करायचे. आपली शबनम बाजूला ठेवून साफसफाई  केल्‍या जायची. मग सुरु व्‍हायचा शाळेचा दिनक्रम.  गुरूजीचा एक ही शब्‍द खाली पडू  द्यायचे नाही, गुरूजींनी  आपणाला काही तरी काम सांगावे असे प्रत्‍येकांना वाटायचे. परंतु गुरुजी ठराविक मुलांनाच काम सांगायचे, याचा इतर मुलांना राग यायचा. गुरूजीचा गावातील सर्व लोकांशी संपर्क असायचा. चांगला असो, भांडकुदळ असो, बेवडा असो वा नालायक, गुरूजींना सर्वच जण नमस्‍कार करायचे आणि  गुरूजी सुद्धा सर्वांना. आठवडाभर मुक्‍कमी राहणारे गुरूजी स्‍वत:ची कामे कधी स्‍वत: करीत तर कधी इतरांकडून करवून घेत. शाळेत तुटका फळा, एकच लाकडी पेटी ज्‍यात शाळेचा संपूर्ण दप्‍तर, एक टेबल, एक  खुर्ची एवढेच काय ते साहित्‍य. एकाच वेळी सर्व वर्गांना शिकवायचे. काही काम असले की, वरच्‍या वर्गातील अंगाने लठ्ठ, धष्‍टपुष्‍ट असलेल्‍या मुलाला मॉनिटर  म्‍हणून उभे करायचे आणि आपले काम पूर्ण करायचे. एखाद्या मुलाला वाचता आले नाही किंवा गणित सोडविता  आले नाही की, गुरुजींची शिक्षा कडक राहत असे. गुरूजींची शिक्षा मिळू नये यासाठी प्रत्‍येक मूल धडपड करी, प्रयत्‍न करी, आणि शिक्षा मिळाली नाही याचा मनातून आनंद व्‍हायचा. याच प्रसंगातून मुले शिकली, मोठी झाली. काहींना सरकारी नौकरी मिळाली, काहींना खाजगी तर काही व्‍यापारी झाले अन उरले सुरले सर्व शेतकरी आणि  शेतमजूर बनले. परंतू त्या गुरूजींला ते अजूनही विसरले नाहीत आणि विसरणार ही नाहीत. कारण गुरूजी आणि मुलांमध्‍ये जिव्‍हाळा निर्माण झालेला असतो.
पूर्वीच्‍या शाळेचा इतिहास पाहता सध्‍याच्‍या सरकारी शाळा त्‍या मानाने खूप चांगल्‍या आहेत. खडू - फळा मोहिम आणि सर्व शिक्षा अभियानामूळे पडक्‍या घरात, ग्रामपंचायतीत किंवा झाडाखाली भरणा-या शाळा स्‍वत: च्‍या इमारतीत भरू लागल्‍या आज  गावोगावी सर्व सोयी सुविधायुक्‍त ( तांत्रिक कारणामूळे सुविधा बंद अवस्‍थेत असेल ती  गोष्‍ट वेगळी ) शाळा आहेत. शिक्षकांना ये-जा करण्‍यासाठी रस्‍ते चांगले झाले आहेत. त्‍यास्‍तव त्या गावात राहण्‍याचा त्यांना प्रश्‍नच येत नाही. तसेच स्‍वत:कडे वाहन असल्‍यामुळे तर  ये - जा  करण्याचा प्रश्‍नच मिटला. आज शाळेवर अध्यापन करण्यासाठी येत असलेला  शिक्षक हा स्‍वत: हुशार असल्‍यामूळे स्‍वत:चे प्रतिबिंब विद्यार्थ्‍यांत पाहणार, यात आश्‍चर्य ते काय ? याच विचार प्रक्रियेतून आज राज्‍यातील जिल्हा परिषदेच्‍या शाळा कात टाकतंय असे म्‍हणणे चूकीचे अन अतिशयोक्‍तीचे ठरणार नाही. संगणक युगाच्‍या काळात आज प्रत्‍येकांच्‍या घरी मोबाईल, लॅपटॉप आणि संगणकाचा वापर चालू झाला आहे. घरात ही वस्‍तू असल्‍यामूळे त्‍याचा वापर शालेय मुले सुध्‍दा करू लागली. जमाने के  साथ चलो  प्रथेनूसार शिक्षक मंडळींना सुध्‍दा याच प्रवाहात सामिल होणे अत्‍यंत गरजेचे आहे. त्‍यानुसार ‘डिजिटल शाळा‍’ ही संकल्‍पना पुढे आली. त्‍यासाठी लागणारा लाख-दिड लाख रूपयांपर्यंतचा निधी सरकार ऐवजी शिक्षक, गावकरी, तरुण मंडळ, ग्रामपंचायत याच्या लोक सहभागातून जमा करण्‍यात येऊ लागला. पाहता पाहता राज्‍यातल्‍या अनेक शाळा डिजिटल क्‍लासरूम मध्‍ये रुपांतर होऊन विद्यार्थ्‍यांना ई-लर्निंग चे धडे द्यायला सुरूवात झाली आहे.  राज्‍याचे शिक्षण सचिव नंदकुमार साहेब आणि शिक्षण आयुक्‍त पुरुषोत्‍तम भापकर साहेब यांनी राज्‍यातील तंत्रस्‍नेही शिक्षकांना दिलेल्‍या प्रोत्‍साहनामूळेच आज राज्‍यात सर्वत्र डिजिटल शाळांचे वारे वाहत आहेत. सध्‍या अजून एक बाब प्रकर्षाने लक्ष वेधून  घेत आहे ते म्‍हणजे कुमठे बीट येथील ज्ञानरचनावाद. दररोज किती तरी शाळांचे शिक्षक, मुख्‍याध्‍यापक आणि अधिकारी वर्ग या कुमठे बीटला भेट देऊन ज्ञानरचनावाद समजून घेत आहेत. त्‍या ज्ञानाचा फायदा आपल्‍या शाळेतील विद्यार्थ्‍यांना देत आहेत. चांगली बाब दृष्‍टीस पडल्‍या शिवाय आपली दृष्टी देखील बदलत नाही हे ही तेवढेच खरे आहे. आज राज्‍यात किती तरी शाळा डिजिटल झाली आहेत. आय एस ओ मानांकनाच्‍या शाळा आहेत. ज्ञानरचनावाद युक्‍त शाळा आहेत. इंग्रजी शाळेला लाजवेल अशा ही  सरकारी शाळा पहायला मिळतात. पूर्वीसारखा शिक्षक आज नक्कीच नाही. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर मोबाईल, टॅब, लेपटॉप आणि संगणकाचा वापर करीत मुलांना गुणवंत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. गरज आहे लोकांनी या सरकारी शाळाकडे चांगल्या दृष्टीने पाहण्याची. सरकारी शाळेतील शिक्षकावर विश्वास ठेवून, त्यांना सर्वतोपरि मदत करण्याची, नक्कीच ते चांगले करून दाखवू शकतात. बहुतांश गावात लोकांची मदत शाळेला मिळत नाही, शाळेला भरपूर निधी येतो तेंव्हा या शाळेला आम्ही का मदत करायची ? अशी विचार प्रणाली गावातील लोकांची असते म्हणून त्या गावाची शाळा नावारूपास येत नाही. शीतावरून भाताची परीक्षा न करता आपल्या गावातील शाळांचे भविष्य आपणच घडवावे. तालुक्यात, जिल्हयात अश्या अनेक शाळा आहेत ज्याचा कायापालट गावातील लोकांनी मिळून केला आहे. आपली एक रुपयांची मदत शाळेला लाखमोलाचे काम करून जाते. शाळा आपली आहे ही संकल्पना तयार होण्यासाठी शाळेला थोडा वेळ द्या, शिक्षकाची समस्या समजून घ्या, त्यांना प्रोत्साहित करा, त्यांना गावकरी मंडळीच्या आधाराची खरी गरज असते. नेमके याच ठिकाणी चुका होतात आणि शाळा फक्त नावालाच शाळा राहते. जेथे वरील पध्दतीने शाळा चालविली जाते, तेथील शाळा खरोखरच सुंदर होतात. इंग्रजी शाळेचे खूळ मनातून काढून टाकून पालकांनी आपल्या मुलांना सरकारी शाळेत प्रवेश देणे गरजेचे आहे. पूर्वी सारख्या शाळा आणि शिक्षक आज राहिले नाहीत म्‍हणून आता  लोकांनी जिल्‍हा परिषदेच्‍या सरकारी शाळांकडे बघण्‍याचा दृष्‍टीकोन बदलणे आवश्‍यक आहे कारण सरकारी  शाळा आता कात टाकतंय.........

नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

Wednesday, 17 February 2016

मोबाईल वेड . . . . 




परमार्थातून आध्यात्मिक जीवन . . . 



मुलींच्या शिक्षणात शासनाची भूमिका 





सरकारी शाळा कात टाकतंय . . . . . 




परीक्षेला जाता जाता . . . .