नागोराव सा. येवतीकर

Wednesday, 26 August 2015

. . . . . .  लेख : पितृदेवो भव . . . .
मानवी जीवनात आई-वडील हे दोन्ही महत्त्वाचे आहेत; परंतु वडिलांपेक्षा आपण सर्वच जण आईला सर्वात जास्त महत्त्व देतो. कारण आई ही प्रत्येक मुलाला आपल्या उदरात नऊ महिने नऊ दिवस अतिशय काळजीपूर्वक सांभाळ करते.
गर्भात जुळलेली नाळ आयुष्यभर टिकून राहते, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तिचा आणि मुलाचा जिव्हाळय़ाचा, प्रेमाचा संबंध असतो.आई ही प्रेमळ, मायाळू आणि मुलांना समजून घेणारी असते तर याउलट वडील हे कठोर, कडक, शिक्षा करणारे आणि मुलांना न समजून घेणारे असतात, असे जनमाणसात आई-वडिलांविषयी बोलल्या जाते. परंतु खरोखरच प्रत्येक वडील एवढा कठोर किंवा निष्ठूर असतो का? साहित्याच्या क्षेत्रातसुद्धा आईवर बर्‍याच साहित्यिकांनी विपुल लेखन केलेले आढळून येते. मात्र त्या प्रमाणात वडिलांवर आधारित लिहिलेले साहित्य फार कमी म्हणण्यापेक्षा नगण्यच आहे. मराठवाड्यातील कवी इंद्रजित भालेराव यांनी 'बाप' या कवितेद्वारे  समाजातल्या वडील मंडळींना एक प्रकारे न्याय मिळवून दिला आहे.

घरकाम करणारी व सतत मुलांच्या सहवासात राहणारी ती म्हणजे आई. त्यामुळे त्यांच्यात जवळीकता निर्माण होते आणि ते आईसोबत मनमोकळेपणाने गप्पा मारू शकतात. तर वडील मात्र कामाच्या निमित्ताने नेहमी घराबाहेरच राहतात. त्यांचा सहवास मुलांना फार कमी मिळतो.

त्यास्तव मुले आणि वडील यांच्यात जवळीकता निर्माण होत नाही. त्यामुळे मुले वडिलांना थोडशे घाबरतात. वडील हे घराचे कर्ते, सवरते, त्यास्तव घरातील विविध जबाबदारी पूर्ण करण्यासाठी नेहमी विचार प्रक्रिया चालूच ठेवावी लागते. कधी कधी बाहेरील कामाचा ताण किंवा आर्थिक बाबींची समस्या त्यांच्या डोक्यावर नेहमीच जाणवत असते. त्यास्तव वड्याचे तेल वांग्यावर काढण्याचे प्रकार वडिलांकडून प्रत्येक घरात होऊ शकते यात शंका नाही. त्याचे परिणाम लहान मुलांवर होतात. बालपणापासून रागात वा संतापात पाहिलेल्या वडिलांची प्रतिमा नेहमीसाठी त्यांच्या स्मरणात राहते. त्यामुळे ती मुले वडिलांसमोर बोलण्यासाठी घाबरतात, भितात किंवा कचरतात.

भारतीय संस्कृती ही पुरुषप्रधान संस्कृती आहे. येथे घरातील सर्व लहान-मोठे काम स्त्रियांनी करायचे आणि घराबाहेरील कामे पुरुषांनी करायची अशी प्रथा आहे. (सध्याच्या काळात यात हळूहळू बदल होत आहे ते चांगले आहे की वाईट ते येणारा काळच ठरवेल.) पुरुषांची सर्व कामे फारच जबाबदारीची, त्यामुळे ती पेलताना पुरुष म्हणजे घरातील वडील नेहमीच तणावात दिसून येतो. त्याचाच परिणाम त्यांच्या वागण्या-बोलण्यावर होत असतो. म्हणूनच आज समाजात आईला जेवढे मोठे स्थान मिळाले तेवढे मोठे स्थान वडिलांना मिळत नाही. मात्र ते स्थान प्राप्त करणे फार जिकरीचे वा कठीण काम नाही. त्यासाठी प्रत्येक वडिलांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

आईकडून मुलांना कौटुंबिक संस्कार मिळतात तर सामाजिक संस्कार वडिलांकडून मिळतात. प्रत्येक मुलावर वडिलांचे अनुवंषिक गुणधर्म फार मोठय़ा प्रमाणात संक्रमित होतात. प्रत्येकजण आपल्या वडिलांसारखा नाव कमावण्याची इच्छा बाळगतो. समाजात वडिलांची प्रतिमा चांगली किंवा वाईट अशी असेल त्याच पद्धतीवर मूल चालते. तेव्हा समाज सहज बोलून जातो की, हा तर आपल्या बापाच्या चालीवर गेला आहे. आपल्या मुलांना समाजात चांगली जागा मिळावी, इज्जत मिळावी, लोक त्यांना मान द्यावे असे वाटत असेल तर प्रत्येक वडिलांनी समाजात चांगले वागण्याचे ध्यानात घ्यावे.

आपली इतरांशी वागणूक चांगली ठेवावी. खोटे बोलून कोणाला फसवू नये, प्रत्येकाशी प्रेमाने व सौजन्याने वागावे. वाईट व्यसनांची सवय ठेवू नये. आपल्या वाईट सवयी हळूहळू आपले मूल विशेषकरून मुलगा आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. दारू पिणे, तंबाखू खाणे, पत्ते खेळणे, विडी वा सिगारेट पिणे, रिकामटेकडे राहून गप्पा मारणे इत्यादी वाईट सवयी लहानपणापासून बघत आल्याने त्याच्या मनात त्याविषयी तिरस्कार निर्माण होण्याऐवजी आकर्षण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे अजून एक नुकसान संभवू शकते. घरात व्यसनी लोकांचे काहीच स्थान नसते, बोलणे कोणी ऐकत नाही आणि स्वाभिमान संपतो. दुसर्‍याला उपदेश करूच शकत नाही. 'मी सांगतो लोकाला शेंबूड माझ्या नाकाला' उक्तीप्रमाणे वागणे निश्‍चित जमणार नाही.

मुलांवर योग्य संस्कार टाकण्याची फार मोठी जबाबदारी वडिलांवर आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्याच्या वेळापर्यंत वडिलांच्या सर्वच वागणुकीची आणि वर्तणुकीची मुले अगदी बारकाईने निरीक्षण करतात. एखाद्या टीप कागदाप्रमाणे आपल्या वर्तनाचे ते अनुकरण करतात. हे प्रत्येक वडिलांनी ध्यानात घेऊन पाऊल टाकल्यास आपले नावसुद्धा नक्कीच उज्ज्वल होईल. माझे घरात कोणीच ऐकत नाही, मानीत नाही अशी तक्रार करणार्‍या वडिलांनी सर्वप्रथम स्वत:चे आत्मपरीक्षण करून आपल्या अंगी असलेल्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केल्यास नक्कीच मानाचे स्थान मिळू शकेल.

वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करता यावी आणि समाजात वडिलांचे असलेले प्रतिबिंब बदलावयाला हवे. सार्‍याच वडिलांनी आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला जागे करून जीवन जगल्यास आणि मुलांसमोर चांगले वर्तन ठेवल्यास आईला जसे प्रेमस्वरूप व वात्सल्यसिंधू ही उपाधी मिळाली तशीच उपाधी वडिलांनाही मिळू शकते. प्रत्येक अपत्याने वडिलांच्या अस्मितेला धक्का लागणार नाही असे जीवन जगणे आवश्यक आहे.
नागोराव सा.येवतीकर
मु. येवती, ता. धर्माबाद  (९४२३६२५७६९)
" पद्मशाली समाजाच्या हातमाग उद्योगाला अच्छे दिन "
खूप वर्षापूर्वी म्हणजे भारतात इंग्रज लोक येण्यापूर्वी भारतातील खेडी स्वयंपूर्ण होती. त्यांच्यात  आपापसातील व्यवहार हे फारच वेगळ्या पद्धतीची होती. कामाच्या मोबदल्यात धान्य द्यायची पद्धत  खरोखरच लोकांना सर्व काही मिळवून देत होती. त्यामुळे गावातील प्रत्येक व्यक्तीला काम मिळत होते आणि त्याच्या मोबदल्यात खाण्यास लागणारे अन्नधान्य मिळत होते. शेतात उत्पादित झालेले धान्य त्याच गावात फिरत राहत होते. पैसा नावाची वस्तू त्यांना माहीतच नव्हते, त्यामुळे जो तो आपापली कामे अगदी चोख आणि व्यवस्थितपणे करीत असत.  यांच्यासाठी गावात बारा बलुतेदार ही पद्दत आस्तित्वात आली होती. ज्यामुळे प्रत्येकाचे काम अगदी सहजपणे कुठलीही समस्या निर्माण न होता पूर्ण होत असे . ज्याचे काम त्या॑नी करावे जसे की वारकांनी केस कापावी, वरटी लोकानी कपडे धूवावी ,चांभारानी चपला शिवाव्यात ,गुरवानी मंदिरांची देखभाल करावी, कुनब्यानी शेती करावी,  साळया नी कपडे विणावी आणि रंगारी लोकानी त्यास रंग लावावी ही पद्धत लोकाना स्वावलंबी जीवनात जगवायला  शिकवायचे . मात्र इंग्रजानी भारतात व्यापार करण्यासाठी म्हणून आले आणि हळू हळू पाय पसरवीत संपूर्ण देशावर आपले वर्चस्व निर्माण केले . कपड्यांचा बाबतीत भारत हा स्वयंपूर्ण व संपन्न देश होता कारण येथील लोक फारच सुंदर कलाकूसर करून कपडे तयार करीत असत . आजही खादीचा कापड भारतात प्रसिद्ध आहे . त्या  कापडाची वैशिष्ट्य म्हणजे हे कापड जाडजूड, टिकाऊ आणि अनेक वर्षे ते कापड फाटले तरी फाटत नव्हते . उन्हाळ्याच्या दिवसात तर या कापडला जास्तीची मागणी असते . भारताचा खरा कपडा म्हणजे खादीचा कपड़ा. हा कपड़ा खेड्यातील पद्मशाली समाजातील लोक हातमागवर विनुन तयार करीत असत. आज ही ह्या समाजातील बरीच मंडळी हा उद्योग करतात. देशात महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश राज्यात हा समाज फार मोठ्या प्रमाणात विखुरलेला आहे . या समाजाचा पारंपारिक व्यवसाय म्हणजे कपडे विणणे ; परंतु इंग्रजांनी भारतात येऊन ज्याप्रमाणे इतर व्यवसायावर घाला घातला तसेच या हातमाग उद्योगांवर सुध्दा घाला घातला गेला . इंग्रजांनी भारतात येऊन जाडजुड कपड्यांच्या जागी मऊ तलम व वजनाने हलकी वाटणारी टेरीकॉट कापड तयार करण्याची यंत्रणा आणली आणि या खादी उद्योगाला घर घर सुरू झाली. भारतीय स्वातंत्र्यंच्या लढ्यात 07 ऑगस्ट 1905 रोजी स्वदेशी चा तीव्र लढा सुरू करण्यात आला  होता.  बाबू गेनू नावाच्या क्रांतीकारकाने  परदेशी कापडाच्या गाडीसमोर आपले बलिदान देऊन स्वदेशी चा लढा सर्व दूर पोहोचविला होता. याच दिवशी भारतात जागोजागी परदेशी कापडाची होळी करण्यात आली होती . यावरून विदेशी कपड्याने भारतात किती मोठे साम्राज्य निर्माण केले होते , याची जाणीव होते . भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर तरी या खादी कपड्यांच्या उद्योगाला चालना मिळेल अशी छोटी आशा होती . मात्र झाले उलटेच . खादी उद्योगाला स्वातंत्र्यानंतर सुध्दा घरघर लागली . ज्या समाजातील लोकांचा हा मुख्य व्यवसाय होता त्यांच्यावर उपासमारी ची वेळ आली होती . या लोकांना पोट भरण्यासाठी इतर कामाच्या शोधात भटकत रहावे लागू लागले यातूनच हा समाज जो पूर्वीच एका ठिकाणी स्थिर होता तो संपूर्ण देशात पसरलेला दिसून येतो . तरी ही त्या॑नी मूळ व्यवसाय सोडलेली नाही . आज ही या समाजातील 43 लाख हून अधिक लोक खास करून हातमागचा व्यवसाय करतात . ग्रामीण भागातील महिला आणि दारिद्रय रेषेखालील जीवनात जगणारी कुटूंबातील महिलांसाठी हाच व्यवसाय उदरनिर्वाह चे एक  साधन आहे. या खादी व्यवसायास चालना मिळावी , प्रोत्साहन मिळावे , आपल्या देशी कापडाचा विस्तार व्हावा यांसाठी भारत सरकारने यावर्षीपासून 07 ऑगस्ट हा दिवस राष्टीय हॅण्डलूम दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे . त्यानिमित्त चेन्नई येथे 07 ऑगस्ट रोजी अौपचारिकपणे या कार्यक्रमाचे उदघाटन भारताचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे त्यामूळे सरकारच्या या निर्णयाने भविष्यात खादी हातमाग उद्योगाला अच्छे दिन येतील असा विश्वास करण्यास काही हरकत नाही
- नागोराव सा. येवतीकर अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटना,
धर्माबाद जि. नांदेड
9423625769
जीवनातील अनमोल मित्र 
मित्र जीवनात हवेहवेसे वाटतात कारण प्रत्येक सुख दुःखमध्ये फक्त आणि फक्त मित्राची साथ आपणाला मिळते. बालपणीचे मित्र, शाळेतलले मित्र, महाविद्यालय मित्र आणि नौकरीच्या ठिकाणी मिळणारे मित्र असे मित्राचे वर्गीकरण करता येईल.
बालपणीचे मित्र जेंव्हा खूप वर्षानंतर मिळतात तेंव्हा खूप आनंद होतो. काय बोलावे ? हे ही सुचत नाही. खूप गप्प होतील, चहा-पाणी होईल, त्या॑नी ज्या ठिकाणी खाल्ले, झोपले उठले, बसले अभ्यास केल, रुसले, मारामारी केले आणि खेळले त्या जागेत काय काय बदलले यावर विचार होईल आणि मनात एक वेगळाच आनंद देऊन जाईल. बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा असे म्हटल्या जाते ते यामुळेच याची प्रचिती यनिमित्ताने पुन्हा एकदा होतो. दिवसभर उन्हात खेळण्याचा ठिकाण आज मात्र ओसाड दिसून येईल. आज त्या ठिकाणी कोणीच खेळत नाही. मुलांची खेळ खेळण्याची आवड कमी झाली की आई-बाबा त्यांना खेळू देत नाहीत हे न उलगडनारे कोडे पडले आहे. काही असो पण आम्ही लहान असताना जे काही उद्योग केले, खेळ खेळले ते आजची मुले नक्कीच करत असताना आढळून येत नाहीत. टीव्ही वरील कार्टून आणि मोबाईल वरील गेमने या मुलांना पुरते वेडं केले आहे. जुने मित्र भेटले की या विषयावर हमखास चर्चा होणारच.
शाळेत गेल्या वर जे आपल्या शेजारी बसतील त्याच्या सोबत मैत्री होते. त्यास आपण पाटी मित्र म्हणतो. LKG, UKG सारखे वर्ग त्यावेळी नव्हते त्यामूळे पेंसिल वही हे पाचव्या वर्गात जाईपर्यंत माहीत व्हायचे नाहीत. कलम-पाटी एवढेच काय आमच्या दफ्तर मध्ये असायचे. बरे दफ्तर भी कसले ती पिशवीच असायची. शुद्धलेखन असो वा बेरीज-वजाबाकी सर्व काही त्या पाटीवरच. कलम उधार देणारे मित्र फार कमी मिळायचे. शाळा संपल्यावर आम्ही कलम जिंकण्याचा खेळ खेळायचे आणि डब्यात सर्व कलम जमा करून ठेवायचे. काही मित्र कलम ने लिहायचे नाही किंवा आमच्या सोबत खेळायचे सुध्दा नाही तरी त्याची कलम कशी काय संपायच्या याचा शोध लावायला वेळ लागला नाही. शाळेच्या पाठीमागे बसून तो संपूर्ण कलम खाऊन टाकायचा आणि कलम नाही म्हणून लिहिणे टाळयाचा मात्र गुरुजी काय त्याला सोडणार. ते काही ऐकुन घ्यायचे नाही आणि शेवटी मदत करणारा तो मित्रच. गृहपाठ पूर्ण करणे असो वा एखादे चित्र काढायचे असो त्यावेळी फक्त मित्रच मदतीला धावून येतात. शालेय मित्राची ओळख आपण आयुष्यभर विसरू शकत नाही. या लहान वयात हेच तर आपणाला चांगले वळण लावतात. या वयात ज्यांना चांगले मित्र लाभले त्याचे आयुष्य सफल झाल्या सारखे आहे. कारण मित्र हे जीवनाला वळण लावणारे तट आहेत. एकमेकांची खोड काढायची आणि गुरुजींचा मार इतरांना मिळवून देण्यात धन्यता मानण्यत येणाऱ्या या वयात आपल्या मित्रांसोबत केलेल्या लहानमोठ्या चेष्टा मस्करी आज आठवले की हसावे की रडावे हेच कळत नाही. शालेय जीवन असेच हसत खेळत कधी संपले हेच कळत नाही आणि सर्व मित्रांची ताटातूट होते. शाळेतील काही स्वप्नं घेऊन महाविद्यालयात जाऊन पोहोचतो. आजपर्यंत विहिरीत पोहनारे मासे जेंव्हा मोठ्या समुद्रात किंवा नदीत जाऊन पडतात तेंव्हा त्या माश्यांची जी अवस्था होते जवळपास तीच अवस्था या ठिकाणी होते. आपल्या विचारांशी सहमत असणारे मित्र मिळणे खूपच कठीण असते. या वयातील मित्र अगदी सहज पणे जोडल्या जात नाही. यांची वय समझदारी मध्ये असते. काय चांगले वाईट आहे कोण कसा आहे या सर्व बाबींचा सूक्ष्म विचार करूनच ते मित्र बनवितात. या ठिकाणी मिळालेले मित्र आजीवन सोबत राहतात. म्हणून यांच्यासोबत कधीही गद्दारी करू नये. अन्यथा जीवनात कोणी मित्र होतच नाहीत. मित्राशिवाय जीवन म्हणजे पाण्याशिवाय मासोळीचे जीवन ज्याप्रमाणे काहीच नाही अगदी तसेच आहे. मैत्री मध्ये गरीब श्रीमंत उच्च नीच अश्या प्रकारचा कुठली ही दरी नसते. मैत्री ही पैसा बघून जर केली गेली असती तर श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या मैत्रीला काही अर्थही राहिला नसता. सुदाम्याचे पोहे आजही मैत्रीची आठवण ताजी करते.
- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
9423625769
नवीन जिल्हा व तालुक्याचे नववर्षात स्वागत होईल . . . . ? 
महाराष्ट्र राज्याची निर्मिती 01 मे 1960 रोजी झाली. त्यावेळी राज्यातील जिल्ह्यांची संख्या 26 होती. तब्बल 21 वर्षानंतर म्हणजे 01 मे 1981 रोजी बॅ. ए. आर. अंतुले राज्याचे मुख्यमंत्री असताना रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग आणि औरंगाबाद जिल्ह्यातून जालना जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. त्याच्या एका वर्षाच्या स्वातंत्र्यदिनानंतर बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना 16 ऑगस्ट 1982 रोजी  उस्मानाबाद जिल्ह्यातून लातूर आणि चंद्रपुर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. सन 1983 ते 1990 च्या काळात राज्यात एकूण 30 जिल्हे होते. प्रशासकीय कामकाज सोपे आणि सोईस्कर होण्यासाठी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या कार्यकाळमध्ये 04 जुलै 1990 रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. भाजप-सेना युतीच्या काळात मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना धुळे  जिल्ह्यातून नंदूरबार आणि अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यांची निर्मिती दिनांक 01 जुलै 1998 रोजी करण्यात आली. राज्य निर्मितीच्या तब्बल 39 वर्षानंतर म्हणजे 01 मे 1999 रोजी नारायण राणे मुख्यमंत्री असताना परभणी जिल्ह्यातून हिंगोली आणि भंडारा जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. राज्याचे सोळावे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात  राज्यातील 36 वा जिल्हा म्हणून ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याची निर्मिती 01 ऑगस्ट 2014 रोजी करण्यात आली.
अशा रितीने राज्यात 1981 नंतर दहा जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली होती. सध्या राज्यात 36 जिल्हे 288 तालुके आहेत. यापैकी अनेक जिल्हा मुख्यालये तसेच काही तालुक्यांची ठिकाणे भौगोलिकदृष्ट्या गैरसोयीची असल्याचे कारण सांगून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जनतेच्या मागणीनुसार जिल्हा व तालुकानिर्मितीची मागणी केली आहे. त्याअनुषंगाने सरकारने 22 नवीन जिल्हे निर्मितीच्या दिशेने पाऊल टाकले आहे. त्यामुळे कंसाबाहेरील 18 जिल्ह्याचे विभाजन करून कंसातील नविन 22 जिल्ह्याची निर्मिती करण्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या दालनात या संदर्भात बुधवारी एका बैठकीत ठरविण्यात आल्याचे वृत्त वाचण्यात आले तेंव्हा मनस्वी आनंद झाला. या नवीन जिल्ह्यात नांदेड (किनवट), लातूर (उदगीर), बीड (अंबेजोगाई), बुलडाणा(खामगाव), यवतमाळ (पुसद), अमरावती (अचलपूर),भंडारा (साकोली), चंद्रपूर (चिमूर), गडचिरोली (अहेरी), जळगाव (भुसावळ),  अहमदनगर (शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर), नाशिक (मालेगाव, कळवण), सातारा (मानदेश), पुणे (शिवनेरी, पालघर (जव्हार), ठाणे (मीरा भाईंदर, कल्याण), रत्नागिरी (मानगड), रायगड (महाड) यांचा समावेश आहे.
एका जिल्ह्याच्या निर्मितीसाठी किमान 350 कोटी रुपये खर्च येणार आहे. राज्य सरकारवर सध्या तीन लाख कोटींहून अधिक कर्ज आहे. अशा परिस्थितीत जिल्हानिर्मितीवर खर्च करणे शक्य नसतानाही सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची मागणी असल्याने सरकारने घेतलेला हा निर्णय धाडसीच म्हणावे लागेल. कारण अगोदरच राज्य सरकारवर तीन लाख कोटींहून अधिक कर्ज आहे आणि त्यात एका  जिल्ह्याच्या निर्मितीसाठी किमान 350 कोटी रुपये याप्रमाणे 22 जिल्हयासाठी 7700 कोटी रुपये खर्चाचा बोजा वाढणार आहे.
सध्या आस्तित्वात असलेले जिल्हे हे काही तालुक्यासाठी आणि तालुक्यातील गावासाठी दीडशे ते दोनशे किमी पेक्षा जास्त दूर असल्यामूळे येथील लोकांना जिल्ह्याच्या कामकाजासाठी येणे-जाणे खूपच जिकरीचे व गैरसोईचे आहे.  एवढा लांबचा प्रवास केल्यानंतर जिल्ह्यांच्या ठिकाणचे काम एका दिवसांत पूर्ण होईल याची ही खात्री नाही. या नागरिकाना ये-जा करतांना दमछाक होते. उदाहरणार्थ नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुका जवळपास दीडशे किमी दूर आहे आणि किनवट तालुक्यातील मांडवी हे गाव दोनशे किमी दूर अंतरावर आहे. मांडवीच्या लोकांना काही कामानिमित्त नांदेड जिल्ह्याला येणे किती कष्टाचे पडू शकते याचा अंदाज आपण बांधू शकतो. येथील लोकांना शारीरिक, मानसिक सोबतच आर्थिक त्रास सुध्दा सहन करावे लागते. त्यासाठी या भागातील लोकांची खूप जुनी मागणी होती नांदेड जिल्ह्याचे विभाजन होऊन किनवट तालुका हा जिल्हा व्हावा. या निर्णयाने त्यांचे स्वप्नं लवकरच पूर्ण होतील असे  वाटत आहे. लोकांना होणारा हा त्रास कमी करणे हे सरकारचे कर्तव्य आहे.
या नविन जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे याठिकाणांना विविध पदांची गरज भासणार आहे. त्यानुसार भरती प्रक्रिया राबवावी लागते. शिपाई पदापासून जिल्हाधिकारी पदापर्यंत नव्याने पदांची निर्मिती होईल आणि तेवढ्या सुशिक्षित बेरोजगार युवकांना त्याचा फायदा होऊ शकतो. लोकांची होणारी ससेहोलपट थांबविन्यासाठी आणि जी गावे जिल्हा निर्मिती मध्ये आहेत त्या शहराचा विकास होण्यासाठी जिल्हा निर्मिती आवश्यक आहे. त्याठिकाणच्या स्थानिक बाबींचे भाव वाढून लोकांनी केलेल्या गुंतवणूकीचा त्यांना फायदा मिळेल. कित्येक बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळेल. स्वतंत्र निधिच्या आधारावर जिल्ह्याचा विकास स्वतंत्रपणे साधता येईल. आज शासनाच्या तिजोरीवर हा बोजा जरी वाटत असेल तरी ही लोकांच्या दृष्टीकोनातून हा निर्णय लोकांच्या कल्याणासाठी व भल्यासाठी आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार हा निर्णय कधी ना कधी घ्यावेच लागणार होते.नागरिकाची गैरसोय आणि प्रशासनांची दिरंगाई होऊ नये, यांसाठी सरकार हे पाऊल उचलले आहे.  त्यामुळे या निर्णयांचे स्वागत समाजाच्या सर्वच स्तरातून होत आहे, हे निश्चितच अभिमानास्पद आहे. यातूनच राज्याचा विकास होईल यात शंकाच नाही. या वर्षाच्या महीनाअखेर समिती आपला अहवाल सादर करेल आणि या नवीन जिल्हा व तालुक्याचे स्वागत येत्या नवीन वर्षात नक्कीच होईल असे वाटते. 
नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769