Sunday 24 March 2024

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव*
प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्याचप्रकारची सृष्टी आपल्या नजरेस पडू शकते. प्रेम म्हटले की आपल्या समोर एक प्रियकर आणि एक प्रेयसी हेच चित्र पहिल्यांदा उभे राहते. याशिवाय प्रेमाचे अन्य कोणतेही चित्र लवकर तयार होत नाही. चित्रपटातून देखील याच विषयावरील प्रेम भडक करून दाखविले जाते त्यामुळे तीच भावना जनमाणसांत उठून दिसते, यात शंका नाही. मात्र प्रियकर आणि प्रेयसी यांच्या व्यतिरिक्त जगात अन्य ठिकाणी देखील उत्कट प्रेम दृष्टीस पडते, ती दृष्टी कवी जीवनसंघर्षकार नवनाथ रणखांबे यांना मिळाली म्हणूनच ते प्रेम उठाव करू शकले. उठाव हा शब्द क्रांतीशी जोडल्या जातो. उठाव करणे म्हणजे अन्यायाविरुद्ध उभे राहणे, अन्याय सहन न करणे असा त्याचा अर्थ घेतला जातो. प्रेमात कसला आला उठाव ? असा प्रश्न वाचकांच्या मनात येणे साहजिकच आहे. कवीच्या भाषेत सांगायचे म्हणजे ' मानवाची घालमेल, मनाच्या अंतरीचे दुःख, व्यथा, वेदना, यांनी मनात साठवून ठेवलेली खदखद याचे रूपांतर असंतोषात होते. आपल्या विरुद्ध झालेल्या किंवा होऊ पाहणारा सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय इ. अन्याय आणि अत्याचार यांच्याविरुद्ध उठवलेला आवाज म्हणजे उठाव होय.' 
अल्बर्ट एलिस या मनोविकास शास्त्रज्ञाच्या मते, प्रेम भावना ही आनंद, दुःख, राग, भीती इत्यादी सर्वसामान्य भावनांसारखी एक आहे. प्रेम उठाव मधील कविता वाचतांना पदोपदी याची जाणीव होत असते. 
संपूर्ण विश्व हे प्रेमावर अवलंबून आहे. प्रेमाशिवाय जीवन जगणे कोणालाही शक्य नाही. तरुणपणाच्या काळात प्रेम जरा जास्त उफाळून येत असते. म्हणूनच कवी आपल्या खास या चारोळीत म्हणतात, 
*प्रत्येकाच्या आयुष्यात , प्रेम होत असतं*
*प्रत्येकाच्या तारुण्यात, कोणीतरी खास असतं*

प्रेमात पडलेली माणसं सर्व काही विसरून जातात. प्रेमात एवढी ताकत आहे की, अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करून दाखवतात. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली माणसं सर्वस्व विसरून जातात ही भावना सांगताना कवी नातं यामधून व्यक्त होताना म्हणतो,
*हृदयाचं नातं तुझ्यासोबत जोडले*
*जगाशी नातं मी सारच तोडले*

प्रेमात विफल झालेली माणसं आपली जीवनयात्रा संपवितात, काही वेडेपिसे होतात असा आजवरचा अनुभव आहे म्हणून कवी आपल्या प्रेयसीला म्हणतो, 
*देवू नको प्रेम चकवा*
*टाकू नको डाव फसवा*


मुलांचं आणि आईचं नातं जगावेगळं आहे. त्याचं प्रेम अवर्णनीय असे आहे. संसाराचा गाडा हाकताना आपल्या आईने सोसलेले कष्ट आणि केलेलं काम मूल कधीही विसरू शकत नाही. कवीची आई देखील अनेक हालअपेष्टा सहन करीत संसार केला असल्याचे अनुभव सांगताना आभाळ होताना माय या दीर्घ कवितेत कवी म्हणतो, 
*झाडाझडती ही तुझ्या जिंदगीची, गरिबीला गरीबीची*
*तवा सोबत तुझ्या हाताची, कष्टाची मोलमजुरीची*
*खंबीर लढताना माय, तुला मी पाहिलय माय*

प्रेमाचा झरा आटला की मायेचा ओलावा संपतो. याउलट जोपर्यंत एकमेकांवर अतूट प्रेम असेल तोपर्यंत विश्वास कायम राहतो आणि दोघांमध्ये असलेले नाते देखील अतूट राहते. याविषयी प्रेम या चारोळीत कवी म्हणतो,
*प्रेम संपले की नाते तुटते*
*प्रेम टिकले की नाते जुळते*

कवीच्या मनावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा आहे. या महान व्यक्तीमुळे आज देशात समता प्रस्थापित होताना दिसत आहे. तरी देखील अजूनही देशात अनेक ठिकाणी भेदाभेद दिसून येते. आपलं भारत देश परत एकदा सुजलाम सुफलाम होण्यासाठी कवी संदेश देताना म्हणतो, 
*आपण सारे भेद टाळूया ।*
*विषमतेला मूठमाती देऊ या ।।*
लेखणी, शब्द माझे, जखम, बेधुंद, रणसम्राट, डोहात, वसंत, खुणा, थेंब, उठाव, मन, पत्ता, शराब, फसवून, दगाबाज, झोका या विषयावरील सर्वच चारोळ्या कमी शब्दांत खूप अर्थ सांगणारे आणि वाचकांच्या मनात खोल रुजणारे आहेत. राहिली हृदयात आणि निळे निशान हे दोन्ही गजल खूपच सुंदर आणि अर्थगर्भित आहे. त्याचसोबत अस्वस्थ, आग, उणीव, घोर, साखळदंड, भीमबाबा, पाऊस, जगणं, प्रीत, बेधुंद, उदास हात, टाकलं ठरवून, या विषयाच्या कविता देखील वाचनीय आहेत. संग्रहात एकूण 39 कविता असून सर्वच अर्थाने परिपूर्ण आणि प्रेमाची महती सांगणाऱ्या आहेत. कमी शब्दांत जास्त अर्थ सांगण्याचा कवीचा प्रयत्न खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. डॉ. प्रेरणा उबाळे यांनी या कवितासंग्रहाची प्रस्तावना केली आहे तर प्रा. डॉ. विठ्ठल शिंदे, डॉ. गंगाधर मेश्राम, प्रा. योगिता कोकरे, प्रतिक्षा प्रजापती थोरात, भटू हरचंद जयदेव यांनी या काव्यसंग्रहाला शुभेच्छा दिल्या आहेत. कवी नवनाथ रणखांबे यांच्या या कवितासंग्रहाचे प्रेमी रसिक वाचक नक्कीच स्वागत करतील अशी अपेक्षा करतो आणि त्यांच्या भावी लेखनाला मनस्वी शुभेच्छा देतो. 

पुस्तक - प्रेम उठाव
कवी - नवनाथ रणखांबे
प्रकाशन - शारदा प्रकाशन, ठाणे
पृष्ठे - ६२
मूल्य - ९० ₹ 

पुस्तक परिचय - नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा, धर्माबाद
9423625769

Saturday 23 March 2024

पुस्तक परिचय - जगणे इथेच संपत नाही ( Jagne ithech Sanpat Nahi )


*जगण्याची आस सांगणारा कवितासंग्रह - जगणे इथेच संपत नाही*


माणसांचे जीवन अनेक सुखदुःखांच्या धाग्यांनी विणलेलं एक वस्त्र आहे. कधी सुखाची किनार आहे तर कधी दुःखाची. जीवनात येणाऱ्या अनेक प्रसंगातून माणूस काही ना काही शिकत राहतो. आलेले अनुभव वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करतो. चित्रकार आपल्या कुंचल्यातून या भावना व्यक्त करत असतो तर कवी मनाचा माणूस कवितेच्या माध्यमातून आपल्या भावना मांडत असतो. कवी हणमंत पडवळ हे देखील असे एक कवी आहेत ज्यांनी आपल्या जीवनात आलेल्या अनेक सुखदुःखांच्या अनुभवाना,  त्यांच्या डोळ्याने पाहिलेल्या निसर्ग सौन्दर्य असेल वा समाजातील लोकांचे हाल असेल याचे चित्रण अतिशय मार्मिक शब्दांत ' जगणे इथेच संपत नाही ' या पहिल्या कवितासंग्रहात केले आहे. म्हणूनच कवी आपल्या मनोगतात म्हणतो की, भावनांच्या ओलाव्यात शब्दांची पेरणी केली तर कवितेच्या झाडाला सुंदर फळे लागतात. मनात भावनांची गर्दी दाटली की ते लगेच शब्द रूपाने कागदावर उमटले जाते आणि अनुभवसंपन्न अशी रचना जन्मास येते अशी कवीची धारणा आहे ते त्यांच्या कविता वाचतांना लक्षात येते. कवीने आपल्या रचना लिहितांना ओढून ताणून शब्द लिहिलेलं नसून त्यांच्या हृदयातून आलेल्या भावना आहेत. कवी स्वतः व्यवसायाने शिक्षक असल्याने त्यांना अनेक प्रसंग, घटना आणि स्थळ यांचा अनुभव मिळालं आहे. कविता करण्यापूर्वी ते छोटे छोटे नाट्यलेखन करत होते. यातूनच त्यांना कविता लेखन करण्याचा छंद लागला आणि त्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आहे.
आपलं आयुष्य म्हणजे एक कोडं आहे. जीवन जगत असतांना अनेक कठीण प्रसंग येतात, त्याला न घाबरता त्याचा सामना करणे आवश्यक आहे, असा संदेश देतांना जगणं या कवितेत कवी म्हणतो,

जगत आलो ... जगायचं पुढं
आपणच आपलं सोडवायचं कोडं

जीवनात आलेले अनेक अनुभव, कडू-गोड प्रसंग आणि जे न देखे रवी ते देखे कवी या उक्तीनुसार कवी आपल्या मनातील भावना व्यक्त करतो. कवितेचा जन्म या कवितेतून कवी म्हणतो,

वेदनेची कळ काळजाला टोचते
तेव्हाच मला कविता सुचते

प्रत्येक संकटाला आणि दुःखाला तोंड देणे हाच यशस्वी जीवनाचा पाया आहे. संकटाला भिऊन पळणारा कधीच यशस्वी होत नाही हाच संदेश बळ ऊर्जेचे या कवितेत कवी देताना म्हणतो,

काय करतील काटे
बधीर माझ्या पायाला
पुन्हा नव्याने सुरू केला
मी रस्ता चालण्याला

स्वाध्याय चळवळीचे प्रणेते परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांनी माणसात देव पहा असे सांगितले आहे तर संत गाडगेबाबा यांनी देखील तसाच काही संदेश दिलेला आहे. आई-वडील हेच खरे आपले दैवत आहेत. पण या लोकांना अजूनही ही गोष्ट का कळत नाही ? असा प्रश्न कवींच्या मनात पडला. म्हणून कवी उद्विग्न होऊन देवाच्या शोधात रचनेत कवी म्हणतो,
माळावरल्या दगडांना आम्ही राऊळात नेले
घरातील दैवतांना आम्ही आश्रमात सोडले

प्रार्थनेमुळे मनाला समाधान मिळते. असे म्हटले जाते की, दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात, प्रार्थनेसाठी जोडलेल्या
दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे. आपण सर्वजण आपल्या सुखासाठी देवाजवळ प्रार्थना करत असतो मात्र कवी प्रार्थना या कवितेत देशावरील सीमेवर डोळ्यात तेल घालून, आपले जीव धोक्यात घालून देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी प्रार्थना करतो,

रोजच जीव तुझा धोक्यात
केवळ देशासाठी
कर जोडतो देवाला आज
फक्त तुझ्याचसाठी
मुलींच्या जन्माबाबत आणि स्त्रियांवरील अत्याचाराबाबत कवीचे मन खूप संवेदनशील आहे असे त्याच्या कविता वाचून लक्षात येते. ज्या वस्तूपासून आपणाला समृद्धी मिळते त्याच वस्तू माणसं का नष्ट करतात ? असा एक प्रश्न कवीला पडतो. अंधारातील वात या रचनेतून कवी म्हणतो,

अंधारात प्रकटते एक वात
वातीलाच का विझवतात माणसे ?

जन्म देणारी आई जगात सर्वश्रेष्ठ आहे. पण कुटुंबाचे पालनपोषण करणारा बाप देखील तितकाच महत्वाचा आहे. वडिलांचे महत्व विशद करतांना कवी खूप सुंदर विश्लेषण करतो,

बाप वाटे उत्साहाचा मळा
तसा तो निर्धाराची शाळा
थकवा ना विसावा त्याला
मायेचं पांघरूण लावितो लळा

चाकाचा शोध लागला, दळणवळण वाढली, लोकांच्या राहणीमान मध्ये सुधारणा झाली पण झोपडीत जे सौख्य लाभते ते कुठे ही मिळत नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या झोपडीत माझ्या या कवितेची प्रकर्षाने आठवण होते. भारत स्वातंत्र्य होतांना राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी देखील खेड्याला विसरू नका असा संदेश दिला होता. कारण खरा भारत हा खेडयात वसलेला आहे. झोपडी या कवितेत कवी देखील वाचकांना असाच संदेश देतो,

सुधारणेचे हे कसले वारे
उगाच नुसता बोलबाला
बापूजी का मग म्हणले होते
लोकहो, खेड्याकडे चला
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तो शेतात राबतो, कष्ट करतो, घाम गाळतो म्हणून तर सर्वांना खाण्यासाठी दोन घास मिळतात. पण हाच जगाचा पोशिंदा मात्र उपेक्षित राहतो अशी खंत आत्मवृत्त या कवितेतून कवी व्यक्त करतो,

काळ्या ठिकार छातीवर
असे घामाचं शिंपण
काळ्या काळ्या मातीमधी
सालो साल नशिबाचं रोपण
काव्यसंग्रह शीर्षक असलेल्या जगणे इथेच संपत नाही या कवितेतून कवी वाचकांना खूप चांगला संदेश देतो. निरुत्साही, नाउमेद झालेल्या व्यक्तींच्या मनात या रचनेतून स्फूर्ती निर्माण होते. कवी म्हणतो,

घाव घालून आडवे केले झाड
खोडालाही फुटली पालवी
खुलून पालवी वाऱ्यावर डोले
सांगून जाते झाड काही
जगणे इथेच संपत नाही
या कवितासंग्रहात विविध विषयांवर आधारित एकूण 81 कविता आहेत. प्रसिद्ध साहित्यिक व कवी योगीराज माने यांची प्रस्तावना या काव्यसंग्रहाला लाभले असून डॉ. शिवाजी शिंदे यांनी पाठ राखण केली आहे. अरविंद शेलार यांनी अतिशय सुंदर असे मुखपृष्ठ तयार केले असून परीस पब्लिकेशनकडून हे काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आले आहे. एकूण 104 पृष्ठ असलेल्या काव्यसंग्रहाची किंमत - 150 ₹ आहे. कवी हणमंत पडवळ यांच्या कविता वाचतांना वाचक मंत्रमुग्ध होऊन जाते. वाचक या काव्यसंग्रहाचे नक्कीच स्वागत करतील अशी आशा आहे. कवीच्या पुढील काव्यलेखनासा मनस्वी शुभेच्छा ......!

पुस्तक परिचय -
नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

पुस्तक परिचय - पाऊस ( Paus )

शब्दांच्या सरीत चिंब करणारा पाऊस कवितासंग्रह
कवितामधून संस्कार आणि प्रबोधनाचे मौलिक संदेश जनमानसांच्या मनात पेरणारे सुप्रसिद्ध कवी गणेश भाकरे यांना समर्पित केलेला उत्तम सदाकाळ यांचा पाऊस कवितासंग्रह म्हणजे शब्दांच्या रिमझिम सरीमध्ये चिंब होण्याची मुलांना मिळालेली एक सुवर्णसंधी. यापूर्वी त्यांचा गंमतगाणी या बाल कवितासंग्रहाचे बालविश्वात जोरदार स्वागत झाले होते. कवी हे पुणे जिल्हा परिषद मध्ये आदर्श शिक्षक असून त्यांना आत्तापर्यंत उत्कृष्ट बालसाहित्यिक पुरस्कारासह अन्य पुरस्कार मिळाले आहेत. राज्यातील अग्रगण्य वृत्तपत्रातून त्यांचे साहित्य प्रकाशित झाले असून बालकथा व कादंबरी लिहिण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांचे बालकथासंग्रह ( ३० ), बालकवितासंग्रह ( २ ), बालकादंबरी ( ३ ), कथासंग्रह ( 15 ), कादंबरी ( ६ ), ललित ( 1 ), अनुवादित कथासंग्रह ( ८ ), अनुवादित कादंबरी ( 1 ) असे विपुल साहित्य प्रकाशित झाले आहेत. पाऊस या कवितासंग्रहाला जेष्ठ साहित्यिक डॉ. विजयाताई वाड यांनी मलपृष्ठावर अभिप्राय देऊन एकप्रकारे त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. 
लहान लहान बालकांचे मन समजून घेऊन त्यांना समजेल अश्या सोप्या भाषेत कविता लिहिणे जरा कठीण बाब आहे. बालकांसाठी कविता लिहितांना त्यात गेय असावे लागते, एक लय असावा लागतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कमीतकमी शब्दांचा वापर करावा लागतो. यासर्व बाबीचा बारीक सारीक विचार करून कवींनी एकापेक्षा एक सुंदर कविता केल्या आहेत. कवीचे संपूर्ण बालपण खेडेगावात गेल्याने तेथील निसर्ग, सण समारंभ, नातेसंबंध त्यांनी जवळून अनुभवले आहे आणि तेच त्यांच्या रचनेतून बाहेर आले आहे. करी मनोरंजन जे मुलांचे,जडेल नाते प्रभुशी तयांचे असे परमपूज्य साने गुरुजी यांनी म्हटले आहे. कवींनी देखील या ओळीला अनुसरून कविता लिहिल्या आहेत.
 पाऊस म्हटलं की लहान मुले अगदी आनंदात नाचतात, उड्या मारतात. त्यांना पावसात भिजायला खूपच आवडते. वाहत्या पाण्यात कागदी नाव सोडण्याचा खेळ न खेळलेला मूल शोधूनही सापडत नाही. या कवितासंग्रहातील पाऊस ही कविता इयत्ता दुसरीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. यात कवी म्हणतो
*अंगणात साचले पाण्याचे तळे*
*कागदाची होडी पाण्यावर पळे*
*मुलांचा खेळ रंगात आला*
*धो धो धो धो पाऊस आला*

आपणा सर्वांना येरे येरे पावसा, तुला देतो पैसा हे गाणे माहीत आहे. आपणही आपल्या मुलांना ते गीत तालासुरात म्हणून दाखवितो. पण कवी हिरवा वसा कवितेत मात्र मुलांना वेगळेच गाणं देतात
*येरे येरे पावसा*
*दरवर्षी असा*
*सुखी कर धरती*
*घे हिरवा वसा*

निसर्गाच्या नियमाने आपण सर्वजण वागलो तर निसर्ग देखील साथ देत असतो. पण निसर्गाच्या बद्दल कृतज्ञ होण्याऐवजी आपण कृतघ्न होत चाललो आहोत. पावसाचा रुसवा या कवितेत मुलांना समजेल अशा भाषेत वर्णन केले आहे. तर वृक्षारोपण या कवितेतून झोपलेल्या माणसाला जागे करण्याचे काम केले आहे. 
*झाडे लावून आपण*
*निसर्ग आपला टिकवायचा*
*झोपी गेलेल्या माणसाला*
*थोडा शहाणपण शिकवायचा*

श्रावण महिन्यातील हिरवळ डोंगर, नदी नाले, भात पिकांची शेती, इंद्रधनुष्य असे स्वर्गापेक्षा सुंदर असे दृश्य फक्त खेडेगावात दिसते असे श्रावण, श्रावणात  आणि आला श्रावण आला या कवितेत कवी निसर्गाचे गुणगान करतो. 
थंडीच्या दिवसांत या कवितेतून कवी घरात काय काय बदल होतात ? कोण काय करतात ? याचे सुंदर असे वर्णन केले आहे. 
*थंडीच्या दिवसात सुगरण आजी*
*तळत बसते खमंग भजी*

चिऊचे बाळ, वसंत, थोरला भाऊ, आजा, हिरकणी, आजी, आधारवड, अनाथ, शाळा, फोन, खारुताई, गावाकडील मज्जा, दुवा, सकाळ, ह्या कविता मुलांना वेगळाच आनंद देऊन जातात. 
फुलात फुल जाईचे, जगात प्रेम आईचे असे आईविषयी बोलल्या जाते. आजपर्यंत अनेकांनी आईवर कविता, कथा कादंबरी लिहिल्या आहेत. तसे आईचे त्याग आहेच त्यात काही शंका नाही पण त्याच तोडीला बाबा देखील असतात. मात्र ते सदाच उपेक्षित राहिले आहेत. आई घराच्या आत सांभाळते तर बाबा घराचा आधार असतो म्हणून कवी आधारवड या कवितेत म्हणतो,
*कष्टात सदा गुंतलेल्या*
*बाबांना कसे विसरावे*
*गुण आईचे गाताना*
*बाबांचेही गीत व्हावे*

हिंदू संस्कृतीमध्ये सणाला विशेष महत्व आहे. या सणांच्या निमित्ताने घराघरांत लहान मुलांवर नकळत संस्कार केले जातात. ग्रामीण भागात आज ही प्रत्येक सण पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. शहरात मात्र हळूहळू सणांचे महत्व कमी होताना दिसत आहे. त्याअनुषंगाने कवीने रचलेल्या नागपंचमी, रक्षाबंधन, गणपती बाप्पा, दिवाळी, होळी, ख्रिसमस म्हणजे नाताळ या सणा विषयीच्या कविता उल्लेखनीय आहेत. 
एकूणच सर्वच कविता सरस, सुंदर व वाचनीय आहेत. कवीच्या हातून भविष्यात असेच सुंदर बाल कविताची निर्मिती होत राहो आणि बालकांना वाचनाचा आनंद मिळो ही मनस्वी सदिच्छा .....! 

पुस्तकाचे नाव - पाऊस ( बाल कवितासंग्रह )
कवी - उत्तम सदाकाळ
प्रकाशन - दिलीपराज प्रकाशन
पृष्ठे - 50
किंमत - 140 ₹

पुस्तक परिचय - नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद
9423625769

पुस्तक परिचय - अलेक्सा ( Aleksa )


कथेतून मूल्यशिक्षण देणारे पुस्तक अलेक्सा 
अखिल भारतीय बालसाहित्य पुरस्कार प्राप्त, मुळत: महाराष्ट्रातील वरोरा येथील रहिवाशी पण सध्या हैद्राबाद येथे वास्तव्यास असलेली, माध्यमिक शाळेतून प्रिन्सिपल पदावरून निवृत्त झालेली, ज्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी आणि तेलगू या चार भाषेत कथा, कविता, ललित लेख, पद्य पथ नाटिका, कादंबरी, बालकथा, बालकविताचे गेल्या 40 वर्षात विपुल लेखन केले आहे अशा आंतरराष्ट्रीय बहुभाषी कवयित्री लेखिका मीना खोंड यांची अलेक्सा ही कादंबरी ई साहित्य प्रतिष्ठानने प्रकाशित केली आहे. या कादंबरीला महाराष्ट्रात मुलांच्या जगात प्रसिद्ध असलेल्या किशोर मासिकाचे संपादक श्री किरण केंद्रे यांच्या खूप साऱ्या शुभेच्छा मिळाल्या आहेत. लेखिकेने यापूर्वी देखील बालसाहित्यात मोलाची अशी कामगिरी केलेली आहे. अलेक्सा कादंबरी म्हणजे अनेक लाडक्या बालमित्रांसाठी ही अनोखी भेट आहे. या ई बुकमध्ये एकूण 10 बालकथाचा समावेश करण्यात आले असून  या कथा वैज्ञानिक, स्वछता आणि निसर्ग संवर्धन करण्याविषयी मुलांना नक्की प्रेरित करतील. अलेक्सा या पहिल्याच कथेत अथर्व आणि आजी यांच्या संवादातून संगणकाची पूर्ण माहिती मिळते. मुलांना मोबाईल, टॅब, आयपॅड यांच्यासोबत अलेक्सा हे देखील आवडायला लागते कारण ती विचारलेली माहिती क्षणात समोर ठेवते. संवाद खूपच छान पद्धतीने मांडण्यात लेखिकेला यश मिळाले आहे. शाब्बास या कथेतून मुलांच्या हातून होणारी लहानशी चूक काय अनर्थ घडवू शकतो याची प्रचिती येते. मग संजू कसा सुधारतो हे वाचनीय आहे. माणसातली माणुसकी या कथेत राजुच्या मनातील संवेदना जागी करते. आज समाजात लोप पावत चाललेली माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी ही कथा खूपच उपयोगी पडेल असे वाटते. पूर्वीच्या काळी जो चिवचिव असा चिमण्यांचा आवाज यायचा ते गायब झाले आहे याची सल चिऊताई या कथेतून मिळते. नुसते बागेत जाऊन येणारे मुलं खूप आहेत मात्र चला बागेत जाऊ या कथेतील मुलं मात्र बागेकडून खूप काही शिकतात आणि वृक्ष संवर्धन करण्याची शपथ घेतात. काव्यात्मक पद्धतीने झाडाचे महत्व सुंदररित्या विषद करण्यात आले आहे. गणेशोत्सव सर्व मुलांचा आवडता सण. याच निमित्ताने मातीची गणपती करायची, त्यात काही बिया ठेवायचे, ती मूर्ती घरातल्या कुंडीत विसर्जित करायची, काही दिवसांनी त्यातून रोप उगवेल त्याला वाढवायचं किती भन्नाट कल्पना मांडली खरी पूजा या कथेत. रक्षाबंधनचा सण देखील अनेक ठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमाने साजरा केला जातो. आश्रमातील भाषणाच्या स्वरूपात मांडलेली राखी कथा मनाला भावून जाते. सूर्य ऊर्जेचा वापर वाढला पाहिजे, मुले विचारप्रवण झाली पाहिजे, संशोधन केली पाहिजे हे सोलर मुन ही कथा वाचताना वाटते. मुलांना इन्स्टंट फूड खाण्याची खूप आवड असते. जर अन्न घटकांचे गोळ्या करून दिले तर देशातील सारे मुलं आरोग्याच्या व शरीराच्या दृष्टीने मजबूत होऊ शकतील असा आशावाद त्यांनी इन्स्टंट फूड या कथेतून व्यक्त केला आहे. मुलांच्या जेवणाच्या बाबतीत घरोघरी खूप मोठा प्रश्न आहे, त्यावर त्यांनी शोधलेला हा उपाय परिणामकारक वाटून जातो. सहल म्हटले की आपल्या डोळ्यासमोर ठरलेलं चित्र येते. मात्र लेखिकेने वाचकांच्या सर्व अंदाज चुकवित एका वृद्धाश्रमात सहल घेऊन जाते आणि तेथील लोकांच्या अनेक समस्या आणि वेदना कळाल्यावर मुलांच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण होते. पुस्तक एकदा हातात घेतलं तर ते पूर्ण केल्याशिवाय खाली ठेवावे असे वाटत नाही. ई बुक च्या स्वरूपात असलेले हे पुस्तक लहान मुलांना नक्की आवडेल अशी मला पूर्ण खात्री आहे. लेखिकेला पुढील लेखनास मनःपूर्वक शुभेच्छा ..... आपणास हे ई बुक ई साहित्य प्रतिष्ठानच्या वेबसाईटवरून डाउनलोड करता येईल किंवा लेखिका मीना खोंड यांच्याशी संपर्क करून त्याची ऑनलाईन प्रत घेता येईल.  

- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड
9423625769

पुस्तक परिचय - प्रतिबिंब ( Pratibinb )

समाजातील चित्रांची प्रतिमा म्हणजे प्रतिबिंब
आपण कसे दिसतो ? हे पाहण्यासाठी प्रत्येकजण आपली प्रतिमा आरशात पाहतात. तसं पाण्यात देखील आपली प्रतिमा दिसते. पण खरी जी प्रतिमा तयार होते ती आपल्या वागण्यावर, बोलण्यावर, चालण्यावर आणि आपल्या मनात येत असलेल्या भावनांवर. आपले प्रतिबिंब आपल्या विचारांवर अवलंबून आहे. अशीच एक अनेक विचारांची मालिका डोक्यात घेऊन प्रा. शि. ल. जोगदंड यांचे प्रतिबिंब नावाचे काव्यसंग्रह नागठाणा ता. उमरी येथील नंदादीप प्रकाशनने प्रकाशित केले आहे. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात कविता वाचनाच्या छंदातून पुढे कविता म्हणण्याचा, लोकगीत, भारुडे, ओव्या आणि अभंग पाठांतर करण्याच्या नादातून कवीमनाचा माणूस प्रा. शि. ल. जोगदंड घडत गेले. लहानपणापासून त्यांनी अनुभवलेले सर्व गोष्टीचे प्रतिबिंब या काव्यसंग्रहातील कवितेतून स्पष्ट होतात, म्हणूनच या पुस्तकाला त्यांनी दिलेलं शीर्षक योग्य व अचूक वाटते. प्रसिद्ध ग्रामीण कथाकार ग. पि. मनुरकर सर यांचा त्यांना मिळालेला आशीर्वाद बहुमोलचा आहे. माणूस असं काही घडवून करतो म्हणजे साहित्य घडत नाही. त्यासाठी योग्य वेळ आणि योग्य काळ याचे गणित जुळावे लागते. नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध साहित्यिक डॉ. भगवान अंजनीकर यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन जोगदंड सरांना ही काव्यनिर्मिती करण्याचे सुचत गेले. सुप्रसिद्ध कादंबरीकार देविदास फुलारी सरांची या पुस्तकाला खूप सुंदर अशी प्रस्तावना लाभली आहे. सदरील काव्यसंग्रह सन 2015 मध्ये प्रसिद्ध झाले असून त्यात असलेल्या एकूण 47 कविता आजच्या काळात देखील तंतोतंत लागू पडतात. 
कवी शेतकऱ्यांचा मुलगा असल्यामुळे शेतकऱ्यांचे दुःख त्यांच्या डोळ्यासमोरून जाता जात नाही. म्हणूनच आपल्या पहिल्याच व्यथा शेतकऱ्याची या कवितेत त्यांनी बँकेकडून मिळणारे कर्ज, सावकाराचा कर्ज काढून केलेली शेती आणि त्यातच अति पावसाने झालेलं नुकसान त्या स्थितीचे सत्य वर्णन मांडले आहे. 

शेतकऱ्यावर गळ्याला फास लावण्याची वेळ आली
पॅकेजसाठी राजकारणी भांडून घेऊ लागली

अंधश्रद्धेमध्ये बळी जाणारे सर्वात जास्त कोण आहेत ? तर स्त्रिया. फार लवकर ते कोणावरही विश्वास ठेवतात आणि फसतात. स्त्री आणि बुवाबाजी या कवितेत ते वाचकांनाच प्रश्न विचारतात की,

बारा राशीवर भविष्य चालतंय का ?
बुवा भविष्याचं अचूक गणित सांगतील का ? 

माणूस मुबलक पाणी असल्यावर त्याचा वापर कसे ही करतो. त्याचे काही नियोजन नसते, असेल तर दिवाळी नाही तर शिमगा. नदी, नाले, ओढे, तलाव या सर्वाचा वापर करताना माणूस काहीच विचार करत नाही हेच त्यांच्या गंगामाई बोलू लागली तर या कवितेतून वाचायला मिळते. ते सुचवतात की

अरे माणसा माणसा कर पाण्याचे नियोजन
त्यातून होईल सर्व सजीवांचे समाधान

देवाने सृष्टी निर्माण करताना सर्व बाबीचा विचार करून मानवी देह तयार केला. विचार करण्याची शक्ती फक्त मानवाला दिली. त्यांचा वापर चांगल्या कामांसाठी करण्याऐवजी तो पशु पेक्षाही खालच्या पातळीवर जाऊन विचार करतोय अशी खंत त्यांनी पाखराची किमया या कवितेत व्यक्त केली आहे. 

तुला दिली रे देवानं जीभ छान
तरी तुझं बोलणं घाण
ते घे सुधारून

घरातला आज खेळत असलेला मुलगा म्हणजे त्या घराचा भावी काळातील आधार असतो. पण पालकांनी त्याच्यावर अपेक्षेचे ओझे टाकून त्याला वाकून टाकू नये. पालकांनी मुलांना समजून वागले तर त्यांच्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव मिळू शकते असा आशावाद प्रिय पालकांनो या कवितेतून व्यक्त करताना म्हणतात

मुलांच्या पाठीवर फिरवा मायेचा हात
त्यातूनच देईल तो आयुष्यभर तुम्हाला साथ

मुलगी जन्माला येऊ नये म्हणून सोनोग्राफी नावाचं एक राक्षस तयार करण्यात आलंय. पूर्वीच्या काळी असे काही तंत्रज्ञान नव्हते. म्हणून स्त्री-पुरुष यांचा लिंगदर समान होता. पण या विज्ञानांच्या क्रांतीने माणसाची नैतिकता हरवली आहे अशी मनातली खदखद विज्ञानाचे गुण-दोष या कवितेतील ओळीतून व्यक्त केले आहे. 

डॉक्टर दादा विज्ञानाचा वापर कर जपून
नाही तर ठरेल विज्ञान अमृत कुंभ विषासमान 

बोर्डाच्या परीक्षेच्या निकालावर एक दृष्टिक्षेप टाकले तर लक्षात येते की, मुलींची उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. मुली ह्या मुलांपेक्षा कष्टाळू, अभ्यासू आणि चिकाटी असतात. मुलगा-मुलगी भेद मानू नका, मुलगी जन्माला येऊ द्या, लेक वाचवा लेक शिकवा या कवितेत ते संदेश देतात

मुलगी म्हणून तुच्छ लेखू नका
मुलगा म्हणून उच्च मानू नका
मुलगा-मुलगी आहेत समान
मुलांपेक्षा मुलीची कीर्ती आहे महान

आजचा पुढारी या कवितेतून त्यांनी राजकारणातल्या पुढारी लोकांचा समाचार घ्यायला देखील विसरले नाहीत. त्यांना विविध प्राण्यांची उपमा दिलेली आहे. 

आजचा पुढारी म्हणजे
दुतोंडी मांडूळ होय
दोन्ही पक्षाकडे वावरणारा

प्रेम म्हणजे काय ? याचे उत्तर या कवितेतून त्यांनी दिला आहे. प्रेमाचा नुसता देखावा काही कामाचे नसून प्रेम हे निस्वार्थी, त्यागी आणि निखळ असेल तर आपले जीवन सार्थक होते असे त्यांनी म्हटले आहे. 

प्रेमात असावी रंगाची उधळण, मैत्रीची गुंफण
वडिलांचं धैर्य, आईच्या हृदयाची कोमलता
लक्ष्मणासारखा बंधुप्रेम सुदाम्याची मैत्री

श्रावण महिन्यात बेलाची पाने शंकराला वाहिली जातात. बेलाची झाडं बोलू लागली अशी कल्पना करून छान संदेश दिलेले आहे. 

शिव शिव म्हणता म्हणता
दुसऱ्याचा का जीव घेता

आजचे शिक्षण म्हणजे फक्त नोकरीसाठी आहे. सर्वाना नोकरी देखील मिळत नाही. ज्या लोकांची काही तरी लिंक असते अश्या गुणवंत नसलेल्या लोकांनाच आज नोकरी मिळते अशी खंत व्यथा शिक्षणाची कवितेतून मांडले आहे. 

पदव्या कितीही कमावल्या तरी लागतो तिथे वशिला
असेल वशिला तर नोकरी मिळते म्हशीला

संत तुकाराम महाराज यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे असे म्हटले आहे. वृक्ष माझा सखा सोबती या कवितेत कवी 
वृक्षासारखा नाही सोबती
वाटसरूना आश्रय देती असे म्हटले आहे. 

देणाऱ्यानं देत जावं या कवितेत कोणाकडून आपणास काय काय घेता येते याचे सुंदर असे वर्णन केले आहे. चंद्राकडून शीतलता घ्यावी, 
मातेकडून वात्सल्य घ्यावं, 
राघवाकडून बोलणं शिकावं 
असे अनेक उदाहरण त्यांनी या कवितेत दिले आहेत. 

एकंदरीत समाजात चालू असलेल्या अनिष्ट प्रथा, रूढी, परंपरा, शेतकऱ्यांचे होणारे हाल, शिक्षणाची अवस्था, स्त्री भृण हत्या असे एक नाही अनेक विषयावरील कवींच्या मनातील विचार काव्याच्या स्वरूपात ' प्रतिबिंब ' या पुस्तकातून व्यक्त झाले आहे. कवी शि. ल. जोगदंड सरांना पुढील काव्य लेखनास मनस्वी शुभेच्छा. 

पुस्तकाचे नाव :- प्रतिबिंब
कवीचे नाव :- प्रा. शि. ल. जोगदंड
नंदादीप प्रकाशन, नागठाणा

पुस्तक परिचय
- नासा येवतीकर, धर्माबाद जि. नांदेड, 9423625769

पुस्तक परिचय - कोल्हेवाडीचा बाजार ( Kolhewadicha Bazar )

बालमनाला आनंदी करणारा काव्यसंग्रह " कोल्हेवाडीचा बाजार "
लहान मुलांसाठी कथा आणि कविता लिहिणे वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. इतरांची बालकविता वाचताना किती सोपी आहे, मी पण लिहू शकतो असे मनाला एकदा वाटून जाते पण लहान मुलांच्या भावविश्वात जाऊन त्यांना समजेल आणि उमजेल अश्या भाषेत कविता लिहिणे सर्वाना जमणार नाही. नांदेड आकाशवाणी केंद्रावरून अनेकवेळा काव्यवाचन देखील केले आहे. नांदेड जिल्ह्यातील  नायगाव बा. येथे जन्मलेले पण सध्या उदगीर येथे वास्तव्यास असलेले कवी शंकर बोईनवाड यांनी खूप छान कविता लिहिल्या आहेत, हे त्यांचे कोल्हेवाडीचा बाजार ही बालकविता संग्रह वाचल्यानंतर लक्षात येते. तसं पाहिलं तर हा त्यांचा दुसरा बालकविता संग्रह आहे. यापूर्वी म्हणजे तब्बल 23 वर्षांपूर्वी म्हणजे सन 1998 मध्ये त्यांचा पहिला वहिला ' चिव चिव चिमणी ' हा बालकविता संग्रह प्रकाशित झाले आहे. कै. भारतभूषण गायकवाड यांच्या सहवासात त्यांनी कथा व कविता लेखनास सुरुवात केली. तसेच कवी प्रा. इंद्रजित भालेराव, प्रा. डॉ. सुरेश सावंत, कवी देविदास फुलारी, प्रा. डॉ. के. हरिबाबू, प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शन, प्रेरणा आणि सहकार्याने या काव्यसंग्रहाची जडणघडण झाली आहे. या काव्यसंग्रहाला प्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांचे आशीर्वाद लाभले आहे तर सदरील काव्यसंग्रह कवींनी आपले बालमित्र असलेले उपजिल्हाधिकारी श्री प्रवीणजी फुलारी यांना अर्पण केले आहे.  कॉलेज जीवनापासून शंकर बोईनवाड यांना वाचन आणि लेखनाची अत्यंत आवड आहे. सुरुवातीच्या काळात पत्रकारिता करणारे शंकर बोईनवाड हे सध्या साप्ताहिक शालेय संकल्पचे संपादक म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी पत्रकारितेत अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. 
कोल्हेवाडीचा बाजार या बालकाव्यसंग्रहात एकूण 22 कवितांचा समावेश केलेला आहे. लहान मुलांना आवडणाऱ्या प्राणी, पक्षी, निसर्ग, आकाश, चंद्र, पाऊस, वारा या सर्व गोष्टी लक्षात घेऊन कवीने मुलांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांना उपदेश करण्यापेक्षा त्यांच्या ओठावर हसू यावे आणि आनंदाने त्यांनी नाचावे असा प्रयत्न त्यांच्या प्रत्येक कवितेत दिसून येते. 
आपला वाढदिवस साजरा करणे प्रत्येक मुलाला आवडते. हीच बाब लक्षात घेऊन पुनमचा वाढदिवस या कवितेतून मुलांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. माकडाचा दवाखाना ही कविता वाचताना मुलांना नक्की आनंद मिळणार आहे. डॉक्टरांच्या सल्याशिवाय स्वतःवर किंवा इतरांवर कधीही काही ही उपचार करू नये असा मौलिक सल्ला ते मुलांना देतात. गाढवाची फजिती ही कविता वाचतांना मुले हसल्याशिवाय राहणार नाहीत.

डब्यातले खडे खड खड वाजू लागले
गाढव जीव मुठीत घेऊन पळू लागले 
कवितेतील या ओळीमुळे मुले आनंदी होतील. पुस्तकाचे शीर्षक असलेली कोल्हेवाडीचा बाजार कवितेत बाजाराचे यथार्थ वर्णन केले आहे. मुलांना यातून नकळत भाजीपाल्याची माहिती मिळणार आहे. बोबडे बोलणाऱ्या मुलांचे जेवढे कौतुक होते तेवढेच त्याच्या बोबड्या बोलीने अडचणी निर्माण होतात. कवी मराठवाड्यातील आणि विशेष करून नांदेड जिल्ह्यातील असल्याने अडकूल ( पोहा ), ढबू असे शब्दप्रयोग केले आहे. घरात व परिसरात वावरणारे मांजर, उंदीर, कुत्रा, गाढव तसेच रानातील माकड या प्राण्यावरील कविता देखील वाचनीय आहेत. शाळा एके शाळा करणाऱ्या मुलांना सुट्टीचे खूप अप्रूप वाटते. त्यातल्या त्यात सुट्ट्यात मामाच्या गावाला जायचे म्हटलं तर यांचा चेहरा बघण्यासारखा असतो. मामाच्या गावाला या कवितेतून माहिती होते. अचानक शाळेला सुट्टी मिळाली तर मुले आनंदाने उड्या मारतात. काही मुलांना शाळा असूच नये रोज सुट्या असावे असे वाटते या आशयाच्या कविता वाचताना मुलाचे मन अजून आनंदी होते. खादाड बंडू कविता वाचताना मुलांच्या तोंडावर हसू फुटल्याशिवाय राहणार नाही.  सिंहगड, जेजुरी आणि अजिंठा लेणीचा प्रवास सहल या कवितेतून केला आहे.

या काव्यसंग्रहात एकापेक्षा एक सरस, मजेदार आणि विनोदी कविता आहेत. कवितेला अनुसरून दोन ते तीन चित्रे प्रत्येक कवितेला दिले आहेत जे की वाचकांना आकर्षित करतात. श्री जी. बी. मुक्कनवार यांची अक्षरजुळवणी खूपच छान आहे तर श्री दत्तकुमार स्वामी यांनी काढलेले मुखपृष्ठावरील वाघ, सिंह, माकड, कोल्हा, पोपट आणि ससा याचे रंगीत चित्र आकर्षक आहेत. कवीमित्र शंकर बोईनवाड  पुढील लेखनास मनस्वी शुभेच्छा ....!

पुस्तकाचे नाव :- कोल्हेवाडीचा बाजार
कवीचे नाव :- शंकर बोईनवाड
प्रकाशक :- गुरूमाऊली प्रकाशन, उदगीर
पृष्ठे :- 28 किंमत :- 51 ₹

पुस्तक परिचय 
नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

पुस्तक परिचय - कोरोना निवास ( Korona Niwas )

कोरोना काळातील इतिहास सांगणाऱ्या कथांचा संग्रह कोरोना निवास
संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरस या विषाणूने प्रत्येक नागरिकाला हादरवून सोडले. चीन मधील वूहान शहरात डिसेंबर 2019 मध्ये या विषाणूचा शोध लागला म्हणून कोव्हीड - 19 असे त्याचे नामकरण करण्यात आले. प्राण्यांपासून पसरलेला हा रोग माणसाला देखील झपाट्याने संसर्गित करू लागला. माणसाचा माणसाशी साधा संपर्क झाला किंवा सहवासात देखील आल्यास या रोगाचा प्रसार होऊ लागला म्हणून या रोगाची प्रत्येकाला भीती वाटू लागली. ह्या रोगाची लागण आपणाला होऊ नये यासाठी प्रत्येकजण विशिष्ट काळजी घेऊ लागला. लोकांचा एकमेकांशी संपर्क होऊ नये म्हणून जगातील प्रत्येक देशाने संचारबंदी लागू करून कित्येक दिवस, महिने करत वर्षभर लॉकडाऊन केले आहे. यामुळे घराघरांत जे काही रामायण-महाभारत घडले आहे ते अनेकांनी आपल्या कविता, वैचारिक लेख, ललित आणि कथांच्या माध्यमातून साहित्याची निर्मिती केली. कोरोना काळातील घटना इतिहासात नोंद होईल असेच आहे. कोरोना विषयावर अनेकांनी विनोद निर्माण केले. ट्वेन्टी ट्वेंटी हा वर्ष काहीतरी विशेष कार्य करून लक्षात राहण्याजोगे कार्य करू असे अनेकांनी मनसुबे तयार केले होते मात्र कोरोनाने हा वर्ष आपल्या नावाने करून घेतला. वर्तमानपत्र आणि टीव्हीच्या माध्यमातून या काळात घडलेल्या अनेक गोष्टी लोकांना घर बसल्या कळले. याच काळात आबालापासून वृद्धांपर्यंत सर्वाना लॉकडाऊन, संचारबंदी, विलगीकरण, सॅनीटायझर, मास्क यासारख्या शब्दाची ओळख झाली. अनेकांचे रोजचे जीवन जगणे विस्कळीत झाले. मुलांचे शाळा विद्यालय बंद पडले. देवालय कुलूपबंद झाले. लोकांचे बाहेर फिरणे थांबले. या सर्व घटनांचा सूक्ष्म अभ्यास आणि आपल्या अफाट विनोदबुद्धी निरीक्षणातून नागेश सू. शेवाळकर यांनी कोरोना निवास हा विनोदी कथासंग्रह शॉपीजन डॉट इन या ऑनलाईन प्रकाशनाच्या माध्यमातून गेल्या मे महिन्यात वाचकांच्या समोर आणले आहे. लेखक नागेश सू. शेवाळकर हे एक सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आहेत. त्यांचे आतापर्यंत सात कादंबरी, दोन धार्मिक, विनोदी व सामाजिक असे वीस कथासंग्रह, शैक्षणिक व राजकीय विषयावर चार चारोळीसंग्रह, विविध क्षेत्रातील चार महनीय व्यक्तीचे चरित्रग्रंथ, दरवर्षी साठ पेक्षा जास्त दिवाळी अंकात लेखन प्रसिद्ध झाली आहेत. ऑनलाईन क्षेत्रात देखील लेखकांची पकड आहे. मातृभारती, स्टोरी मिरर आणि शॉपीजन सारख्या ऑनलाईन साहित्य मंचावर त्यांचे असंख्य वाचक आहेत. स्टोरी मिरर या ऑनलाईन ई संस्थेद्वारे आयोजित 52 आठवडे लेखन आव्हान स्पर्धेत पाच हजार स्पर्धकांमधून त्यांना विजयी घोषित करण्यात आले होते. त्यांची अनेक पुस्तके महाराष्ट्र शासनाने छापून शाळांमध्ये वितरित केले आहे. 
या विनोदी कथासंग्रहात एकूण सोळा कथा असून लहान मुलांसाठी देखील बालविभागामध्ये एकूण सात कथाचा समावेश करण्यात आला आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहताच वाचकांना पुस्तक वाचण्यास भाग पाडते. घड्याळाचे चित्र म्हणजे माणसावर आज कोरोनामुळे कशी वेळ आली आहे हे दर्शविते तर त्याच घड्याळावर एकजण सुई घेऊन पळत आहे याचा अर्थ कोरोनाला संपवायचे असेल तर लसीकरण अत्यंत महत्वाचे आहे असा संदेश यातून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पुस्तकात लसीकरण या विषयाच्या भोवताली बहुतेक कथा गुंफलेल्या आहेत. कोरोना प्रतिबंध करण्यासाठी सरकार लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले मात्र त्याबद्दल समाजात ज्या काही अफवा पसरविण्यात आल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने हे सारे खोटे आहे, हे दर्शविण्यासाठी जेष्ठ नागरिक असलेले अप्पा लसीकरण करून घेतात. त्यानंतर जे काही धमाल होते " हरवला चष्मा सापडली सुषमा " या कथेत वाचण्यास मिळेल. कोरोना पॉजिटिव्ह झाल्यानंतर व्यक्तीला चौदा दिवस विलगिकरण राहणे आवश्यक आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने दवाखान्यात बेड, ऑक्सिजन याची कमतरता भासू लागली. म्हणून मध्यमवर्गीय व्यक्ती घरातल्या घरात ती सुविधा मिळावी यासाठी प्रयत्न करू लागले. भविष्यात ही समस्या निर्माण झाली तर आपणाला कोणत्या दवाखान्यात जाण्याची गरज भासू नये म्हणून त्या प्रकारच्या घराचा शोध घेऊ लागला. अस्मिता आणि अभ्यंकर हे मध्यमवर्गीय जोडपे देखील तसा एक फ्लॅट पाहतात पण ते फ्लॅट त्यांना मिळते की नाही हे पुस्तकाचे शीर्षक असलेले " कोरोना निवास " ही कथा वाचल्यानंतर कळते. 
कोरोना काळात काही लोकांना खूप त्रास झाला तर काही लोकांनी याच काळात आपली चांदी करून घेतली. विशेष करून दवाखान्यात कशी लूट चालू होती. स्वतःला अनुभव आल्यावर माणूस कसा बदलतो ? हे फास कोरोनाचा या कथेतून लेखकांनी सुंदररित्या मांडले आहे. तर गोरगरिबांना डावलून श्रीमंतांना पहिली सुविधा देऊ नये असा एक संदेश कोरोना आजी या कथेतून मिळतो. सरकारने तयार केलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्यात कोणी कसर केल्यास त्यांना शिक्षा देखील मिळाली. कोरोना नियमांचा सर्वात जास्त त्रास जर कोणाला झाला असेल तर ते लग्न कार्य करणाऱ्या लोकांना. वीस-पंचवीस लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्नाचे कार्य करणे खूप जिकरीचे होते. लग्नाला जास्त मंडळी उपस्थित आहेत म्हणून आयोजकांवर गुन्हे देखील दाखल झाले. असेच एक लग्न कार्य " कोरोना गेला " ही कथा वाचतांना वाचकांना तोंडावर हसू आणल्याशिवाय राहत नाही.
कोरोना प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण करणे महत्वाचे आहे त्यासाठी लोकप्रतिनिधी किंवा वॉर्ड नगरसेवक यांनी मोफत लसीकरणासाठी काय नियोजन केले आहे " आली का ? आली का ? " या कथेत पाहण्यास मिळेल. जनतेमध्ये लसीकरणाविषयी जे गैरसमज आहे त्याविषयी भन्नाट अशी कथा " धास्ती कोरोनाची " मध्ये वाचता येईल. लेखकांनी लोकांना आलेले अनुभव आणि सोशल मीडियात प्रसिद्ध झालेल्या अनेक घटनांचा वापर कथेत केलेला आहे. त्यामुळे कथा वाचतांना हे आपल्या आसपास घडत आहे असेच वाटते. सहज सोपी संवाद शैली आणि समर्पक शब्दरचना यामुळे कथा वाचतांना कोठेही निरसपणा वाटत नाही.
कोरोना या नावाचा शोध कसा लागला असेल याचा शोध लेखक स्वतः लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. " कोरोना की करीना " ही कथा म्हणजे लेखकांजवळ असलेली तर्कशक्ती दर्शविते. सामान्य माणूस आपले जीवन कसे जगतो ? काय बघितल्यावर किंवा वाचल्यावर आनंद वाटते याची कल्पना या कथेतून मिळते. या कथासंग्रहात एकापेक्षा एक सरस विनोदी कथा वाचण्यास मिळतात.
कोरोनामुळे शाळा व महाविद्यालय बंद झाली. शिक्षकांचे व मुलांचे शाळेत जाणे बंद झाले. मुले कोरोनाची शिकार होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. सर्वच मंडळी घरात कैद झाल्यावर घराघरांत काय घडले याचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न बालकथा विभागात केले आहे. शाळा महाविद्यालय बंद झाले तसे देवालय देखील कुलूपबंद झाली. विनोद आणि त्याची आजी यांच्यातील संवादातून लॉकडाऊनमध्ये घरात काय घडले आहे याची प्रचिती येते. " चिऊताई दार उघड ना ! " या कथेतून कोरोना काळात लोकांनी स्वछता विषयी कशी जागरूक झाली होती ? हे कावळेदादा आणि चिऊताईच्या माध्यमातून सांगितले आहे. कोरोनामुळे मनुष्य स्वछतेचे सारे नियम पाळत आहे हे या कथेतून कळते. अनेक शाळांच्या शिक्षकांनी व्हाट्सअप्पचा वापर करून मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. तो ही एक अनुभव चव्हाण सरांच्या अनुभवातून " माझी शाळा, कोरोना शाळा " यातून दिला आहे. आजोबांचा अष्टचंद्रदर्शन ऑनलाईन वाढदिवस कसा साजरा होतो हे वाचल्याशिवाय कळणार नाही. कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द झाली. यामुळे हुशार विद्यार्थ्यांवर एक प्रकारे अन्याय आहे या आशयाची कोरोना उत्तीर्ण या कथेत वाचण्यास मिळेल.  बहुतांश विद्यार्थ्यांना कसे का होईना परीक्षा हवी होती, असा संदेश कथेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे, जे की स्तुत्य वाटते. सर्व कथा ह्या वाचनीय आणि खळखळून हसविणारे आहेत. ऑनलाईन माध्यमातून पुस्तकाच्या रूपाने बाहेर पडलेल्या या पुस्तकाचे वाचक नक्की स्वागत करतील अशी मला खात्री आहे. शॉपीजन डॉट इनच्या मराठी विभाग प्रमुख ऋचा दीपक कर्पे यांच्या अथक परिश्रमातून हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले असून यात एकूण 105 पाने आहेत. पुस्तकाची बांधणी उत्तम आहे. पुस्तकाची किंमत 153 ₹ आहे. शॉपीजनवर ई पुस्तकाचे प्रकाशन नि:शुल्क असून ई पुस्तकाच्या प्रकाशनासाठी लेखकांकडून कुठलेच शुल्क आकारले जात नाही. आता वाचकांसाठी पुस्तकांची हार्डकॉपी देखील उपलब्ध करून देत आहे. शॉपीजन फक्त एक नाव किंवा संस्था नसून लेखकांचे स्वप्न साकार करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. गुगल प्ले स्टोरवर हे अँप विनामूल्य उपलब्ध आहे. 

पुस्तक परिचय - 
नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक, धर्माबाद जि. नांदेड, 9423625769

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...